
मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त करण्यासाठी आता मैदानातील रेती मिश्रित मातीचा थर काढण्यात येणार आहे. जेसीबीच्या मदतीने ९ इंच मातीचे थर काढण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या जी उत्तर दादर विभागाने पालिका प्रशासनाला सादर केला आहे. तसेच धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी क्रिकेट पिचेसची देखभाल करणाऱ्यांना मैदानासह आजूबाजूला पाण्याचा मारा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दादर येथील शिवाजी पार्क मैदान राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रिकेट खेळासाठी प्रसिद्ध आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी असे प्रसिद्ध क्रिकेटपटू शिवाजी पार्क मैदानातून घडले. शिवाजी पार्क मैदानात दररोज शेकडो नागरिक याठिकाणी सकाळ- संध्याकाळी आणि संपूर्ण दिवसभर फेरफटका मारण्यासाठी येतात. शिवाजी पार्क मैदान २८ एकर आणि १.२ किमीचा परिघ अशा विस्तीर्ण परिसरात पसरलेले असल्याने हवेसोबत धुळीचे भलेमोठे लोण पसरतात. या मैदानात सुमारे ७० टक्के मातीचा भाग तर ३० टक्के हिरवळ आहे. मोठ्या प्रमाणातील मातीच्या भागामुळे शिवाजी पार्क मैदान परिसरात धुळीमुळे प्रदूषण होते. याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत असल्याने पालिकेकडून मैदान धूळ मुक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळी मैदानावर पाण्याचे फवारे मारले जातात. मात्र सकाळी १० नंतर उन्हाचा जोर वाढल्यानंतर पुन्हा धूळ हवेत उडते. त्यामुळे मैदान कायमस्वरूपी धूळ मुक्त करण्यासाठी पालिकेकडून व्यापक प्रमाणात उपाययोजना करण्यात येणार आहेत.
'आयआयटी'च्या तंत्रज्ञानाने होणार काम
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील धुळीची समस्या कमी करण्यासाठी 'आयआयटी' मुंबईच्या तंत्रज्ञानाचा वापरही केला जाणार आहे. यासाठी नेमलेल्या सल्लागार समितीच्या निर्देशानुसार 'आयआयटी'ने अहवालही सादर केला आहे. यामध्ये 'आयआयटी'च्या तज्ज्ञांनी अनेक सूचना केल्या असून उपायही सुचवले आहेत. यानुसार लवकरच कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अहवालाचा अभ्यास करण्यात येत असून प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.