
मुंबई : मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे हंडी बांधताना उंच मनोऱ्यावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू झाला. तर, घाटकोपरमध्येही एका १४ वर्षीय तरुणाचा टेम्पोमधून पडून मृत्यू झाल्याने दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले.
गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात उपचारादरम्यान जगमोहन शिवकिरण चौधरी (३२) याचा मृत्यू झाला. मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे बाल गोविंदा पथकाच्या वतीने हंडी बांधण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यादरम्यान तोल जाऊन जगमोहन चौधरी या तरुणाचा पहिल्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर तरुणाला उपस्थितांनी नजीकच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गावदेवी गोविंदा पथक हे अंधेरी पूर्व येथून आदर्श नगर परिसरातून जात असताना रोहन मोहन माळवी (१४) हा टेम्पोतून खाली पडताच बेशुद्ध झाला. कावीळ झाली असल्याने तो थर रचण्यात सहभागी झाला नव्हता, पण गोविंदा पथकासोबत होता. त्याला घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
न्यायालयाच्या आदेशांनंतरही १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग
उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवात १४ वर्षांखालील मुलांच्या सहभागाला नकार दिला आहे. तरीही अनेक गोविंदा पथकांनी न्यायालयाच्या आदेशाला पायदळी तुडवत १४ वर्षीय मुलांना गोविंदा पथकात सामावून घेतले. तसेच, या मुलांना सर्वात वरच्या थरावर चढवून त्यांच्याकडून दहीहंडी फोडण्यात आली.