

मुंबई : दहीहंडीच्या उत्सवात थरांचा थरार अनुभवताना सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि दहीहंडी समन्वय समितीने केले आहे. गोविंदा पथकांनी न्यायालयीन निर्देशांचे पालन करत उत्सवात सहभागी व्हावे, असे सांगतानाच दुचाकीवर ट्रिपल सीट रायडिंग करू नये आणि ट्रकच्या टपावर किंवा फळ्यांवर बसून प्रवास टाळावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
गोविंदांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, वाहने सावकाश चालवावीत आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांशी वाद घालण्याऐवजी त्यांच्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
दहीहंडीच्या खेळात १४ वर्षांखालील मुलांना सहभागी करून घेण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक सहभागी गोविंदाचा १० लाख रुपयांचा विमा काढणे आवश्यक असून, सर्वांत वरच्या थरावरील गोविंदासाठी सुरक्षा हार्नेस वापरणे बंधनकारक आहे. थर रचण्याच्या ठिकाणी मॅट किंवा गाद्यांची व्यवस्था करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
गोविंदा मंडळांनी प्रत्यक्ष दहीहंडीच्या वेळी सरावात केलेल्या थरांच्या संख्येपेक्षा अधिक थर रचू नयेत, असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
आजारी मुलांना खेळापासून दूर ठेवण्यासह हेल्मेट, जॅकेट आणि हार्नेस यांसारख्या सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मद्य किंवा अंमली पदार्थांचे सेवन करून खेळात सहभागी होण्यासही मनाई करण्यात आली आहे.