

भाईदर : मुंबई परिसरातील रस्ते व उड्डाणपुलाच्या कामांमधील अपघातांची मालिका चालूच असून शनिवारी मीरा रोडमध्ये झालेल्या दुर्घटनेत दोघे जण ठार झाले. रस्त्याच्या कामातील क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून दोन कामगारांच्या अंगावर पडल्याने त्यांचा बळी गेला असून या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मीरा रोड रेल्वे स्थानकालगत पश्चिम बाजूला दहिसर-भाईंदर रस्त्याच्या कामाकरिता उभारलेल्या कास्टिंग यार्डमध्ये हा अपघात घडला. अपघातात रघुनाथ दास (वय ३८ मूळ ओदिशा) आणि कान्हा सिंग (वय ४५, मूळ-जालंदर, पंजाब) हे दोन कामगार मरण पावले.
भाईंदर पश्चिम येथील डिबी रिअॅलिटी यांचे प्लॉटमध्ये कोस्टल रोडचे कोस्टल गर्डर बनविण्याचे काम एल अॅण्ड टी कंपनीमार्फत चालु आहे. या ठिकाणी गर्डरची हालचाल करण्याकरिता गॅन्ट्री क्रेन ठेवण्यात आली असून, तिच्या वरील बाजूस कामगारांना उभे राहण्याकरिता प्लेटफॉर्म बनविण्यात आला आहे. याच दरम्यान शनिवारी सव्वाबारा वाजता सदरील कंपनीने उभारलेल्या क्रेनच्या प्लॅटफॉर्मवर काम करत असताना अचानक तो तुटून कोसळला. त्यामुळे यात त्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगार गंभीर जखमी होऊन दोघांचा अपघाती मृत्यू झाला, तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी भाईंदर पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी सदरील मृतदेह ताब्यात घेत भाईंदर पश्चिमेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे व पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात मानखुर्द येथे उड्डाणपुलाच्या कामात झालेल्या एका दुर्घटनेत मोटारसायकलवरून चाललेल्या एका पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी मुलुंडमध्येही असाच प्रकार घडला होता.
कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर
मिरा भाईंदर शहरात शेकडो इमारती व प्रकल्पाची नवनिर्माणाधीन विकासकामे सुरू असून त्यात अनेक अपघात घडून कामगारांचे बळी गेले आहेत. संबंधित विभागचे अधिकारी मिरा भाईंदरमध्ये फिरून कामगारांच्या सुरक्षेततेसाठी उपाययोजना न करता फक्त आपली खुर्ची गरम करत असतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यात निष्पापांचे बळी जात असून पोलिसदेखील बडे विकासक, ठेकेदार यांना पाठीशी घालतात अशी सार्वत्रिक तक्रार आहे.