मुंबई : दहिसर येथे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, रविवारी तिचा वाढदिवस होता, त्याच दिवशी घरात गळफास घेऊन तिने जीवन संपविल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. तिच्याकडे पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मृत १४ वर्षांची मुलगी दहिसर येथे तिच्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहते. तिचे वडील मजुरीचे काम करतात, तर आई घरकाम करते. रविवारी ते दोघेही नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते. यावेळी ही मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसोबत घरी होती. काही वेळाने तिची बहीण कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी घरात कोणीही नसताना तिने गळफास लावून आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी ही माहिती तिच्या बहिणीसह आई-वडिलांना दिली. त्यांनी तिला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांसह बहिणीची जबानी नोंदविण्यात आली आहे.