

घरात येऊन प्रचार करायला विरोध केल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन व्यक्तींना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दहिसरमधून समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या ८ ते १० कार्यकर्त्यांविरोधात रात्री एम.एच.बी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी दहिसर प्रभाग क्रमांक १ मध्ये ही घटना घडली. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा राम यादव यांनी प्रचार रॅली काढली होती. यावेळी काही कार्यकर्ते विठ्ठलवाडी सोसायटीजवळील एका घरात जाऊन प्रचाराच्या प्रयत्नात होते. मात्र घरातील व्यक्तींनी घरात येऊन प्रचार करण्यास मज्जाव केला. याचा राग आल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घरातील दोन पुरूषांना बाहेर खेचून बेदम मारहाण करण्यात आली. व्हायरल व्हिडिओमध्ये जमाव दोन व्यक्तींना रस्त्यावरच लाथा-बुक्क्यांसह, लाठ्या-काठ्यांसह पक्षाच्या झेंड्यांनी बेदम मारहाण करताना दिसत आहेत.
या घटनेनंतर एम.एच.बी पोलिसांनी रात्री शिवसेना शिंदे गटाच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून धरपकड सुरू केली आहे. दरम्यान, अशाप्रकारच्या गुंडगिरीमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. निवडून येण्याआधीच ही परिस्थिती आहे, तर मग निवडून आल्यावर हे लोक काय करतील, असा सवाल स्थानिक विचारत आहेत.