Mumbai : चिंता मिटली! धरणात ३१२ दिवसांचा ८८.४० टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. २७ जुलै रोजी सातही धरणातील पाणीसाठा १२ लाख ७९ हजार ५३४ दशलक्ष लिटर अर्थात ८८.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मे २०२७ पर्यंत म्हणजेच ३१२ दिवस पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
Mumbai : चिंता मिटली! धरणात ३१२ दिवसांचा ८८.४० टक्के पाणीसाठा
Mumbai : चिंता मिटली! धरणात ३१२ दिवसांचा ८८.४० टक्के पाणीसाठाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. २७ जुलै रोजी सातही धरणातील पाणीसाठा १२ लाख ७९ हजार ५३४ दशलक्ष लिटर अर्थात ८८.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मे २०२७ पर्यंत म्हणजेच ३१२ दिवस पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत २७ जुलै रोजी १२ लाख ७९ हजार ५३४ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू राहिली तर पुढील काही दिवसांत १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेच्या जलविभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात एल निनोचा प्रभाव असल्याने धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे. मात्र सातही धरणातील पाणीसाठा १०० टक्के झाला तर १० टक्के पाणीकपात मागे घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. जून महिन्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच वरुणराजाने धुव्वाधार बॅटिंग करायला सुरुवात केल्यानंतर पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. मुंबईला पाणीपुरवठा करणारी बहुतांश धरणे पालघर, वाडा, नाशिकमध्ये आहेत, या पट्ट्यात पाऊस जोरदार बरसत असल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबईत काही भागांत १५ टक्के पाणीकपात

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागामार्फत पांजरापूर येथील मुंबई ३-अ उदंचन केंद्रातील ६.६ के.व्ही. उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम मंगळवार, २८ जुलै रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी उदंचन केंद्र सुमारे २० तास बंद ठेवावे लागणार असल्याने शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यात सुमारे १५ टक्के कपात केली जाणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून २९ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत पांजरापूर येथून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत विद्यमान १० जुन्या उच्चदाब नियंत्रण पॅनेलच्या जागी अत्याधुनिक आणि अधिक कार्यक्षम १० नवीन पॅनेल बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात चार उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे काम करण्यात येणार असून, भविष्यातील जलपुरवठा व्यवस्था अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करण्याचे आणि पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in