

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ७.२३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ९ जुलै रोजी जवळपास निम्म्यावर म्हणजेच ४९.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे ६ टक्क्यांपर्यंत घसरलेल्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण क्षेत्रात असाच पाऊस बरसत राहिला तर धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत ९ जुलै रोजी ७ लाख ३ हजार २६० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पाऊस असाच बरसत राहिला तर पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होईल आणि मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास आहे.
९ जुलै रोजी पाणीसाठा (टक्के)
अप्पर वैतरणा - २६.८८
मोडकसागर - ८२.६६
तानसा - ७७.४८
मध्य वैतरणा - ४२.१२
भातसा - ४२.६८
विहार - १००
तुळशी - १००
धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)
अप्पर वैतरणा - १६०.० मिमी
मोडकसागर - ८५.० मिमी
तानसा - ६६.० मिमी
मध्य वैतरणा - ८४.० मिमी
भातसा - ३३.० मिमी
विहार - ७९.० मिमी
तुळशी - ७०.० मिमी