मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.
मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर
मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा ५० टक्क्यांवरप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात गेल्या २४ तासांत ०.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ५०.७७ टक्क्यांवर पोहोचला असून मुंबईकरांसाठी किंचित दिलासा मिळाला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यातील दमदार वृष्टीनंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे धरणातील पाणीपातळी घसरली होती. मात्र गेला आठवडाभर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. २० जुलैनंतर पाऊस पुन्हा सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याने ही पातळी आणखी वाढेल असा विश्वास पालिकेच्या जल विभागाने वर्तवला आहे.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर

पाणी साठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात १८ जुलै रोजी ७लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर पाणी साठा आहे. धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु राहिल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि मुंबईवरील पाणी कपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

१८ जुलै रोजी पाणीसाठा ( टक्केवारीत)

  • अप्पर वैतरणा - ३०.६६

  • मोडक सागर - ७७.४४

  • तानसा ८०.४१

  • मध्य वैतरणा - ४५.४७

  • भातसा ४५.३५

  • विहार - १००

  • तुळशी - ९८.०२

धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)

  • अप्पर वैतरणा - ७५ मिमी

  • मोडक सागर - ९९.०० मिमी

  • तानसा - २९.०० मिमी

  • मध्य वैतरणा - ५५.०० मिमी

  • भातसा - ७४.०० मिमी

  • विहार - ६.०० मिमी

  • तुळशी - ३०.०० मिमी

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in