मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गाला मार्च २०२४ पर्यंत ‘कवच’चे संरक्षण

रेल्वे सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार केला आहे
मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गाला मार्च २०२४ पर्यंत ‘कवच’चे संरक्षण

मुंबई : ओदिशात झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर ‘कवच’ची चर्चा देशभरात होऊ लागली. रेल्वेने विविध मार्गांवर ‘कवच’ बसवायला प्रारंभ केला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई व देशाची राजधानी नवी दिल्ली रेल्वे मार्गावर मार्च २०२४ पर्यंत ‘कवच’ यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या मार्गावर ही यंत्रणा बसवण्याचे काम वेगाने सुरू असून, दोन विभागांत त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

‘कवच’ ही अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रणा आहे. रेल्वेचे परिचलन सुरक्षित होण्यासाठी ही यंत्रणा वापरली आहे. या यंत्रणेमुळे लोको पायलटला विशिष्ट वेगमर्यादेच्या पुढे गाडी गेल्यास तात्काळ ब्रेक लागतात. खराब हवामानातही रेल्वेचे परिचलन सुरक्षित होते. फेब्रुवारी २०१६ पासून ‘कवच’ची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर त्रयस्थ कंपनीकडून त्याचे मूल्यांकन करण्यात आले. २०१८-१९ मध्ये तीन कंपन्यांनी त्याच्या पुरवठ्याला मान्यता दिली, तर जुलै २०२० मध्ये ‘कवच’ हे राष्ट्रीय टक्करविरोधी यंत्रणा म्हणून स्वीकारण्यात आले.

आतापर्यंत १४६५ किमीवर ‘कवच’ बसवण्यात आले आहे. १२१ इंजिनमध्ये ते बसवले आहे. आता अत्यंत महत्त्वाच्या दिल्ली-मुंबई व दिल्ली-हावडा मार्गावर बसवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. हे दोन्ही मार्ग ३ हजार किमीचे आहेत. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होईल. मुंबई-दिल्ली मार्गावर याच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

रेल्वे सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार केला आहे. आणखी ६ हजार किमी मार्गावर ‘कवच’ योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

आतापर्यंत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ३५१.९१ कोटी रुपये खर्च केले आहेत. या खर्चात रुळा बाजूकडील सामुग्री, स्टेशनवरील यंत्रणा आदींसाठी ‘कवच’चा खर्च प्रतिकिमी ५० लाख रुपये आहे, तर इंजिनमध्ये ‘कवच’ बसवण्याचा खर्चप्रति ७० लाख रुपये आहे.

मुंबई-दिल्ली मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसवल्यास तो मार्ग सुरक्षित व विश्वासार्ह होईल. त्यातून लाखो प्रवासी सुरक्षित प्रवास करतील. तंत्रज्ञानात सुधारणा करून भारतीय रेल्वेने मोठी झेप घेतली आहे. त्यातून भारतीय रेल्वेचे नेटवर्क अधिक कार्यक्षम व सुरक्षित बनणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in