मुंबईतील धक्कादायक प्रकार; फूड डिलिव्हरीसाठी आलेल्या एजंटचे महिलेसमोर अश्लील चाळे, पोलिसांनी केली अटक
मुंबई : मुंबईच्या गिरगावमधून धक्कादायक प्रकार समोर आला असून २८ वर्षीय महिलेसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या फूड डिलिव्हरी एजंटला वी.पी. रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना २१ मार्च रोजी घडली होती, पण आरोपीला आता अटक झाल्यानंतर ती उघडकीस आली आहे.
माहितीनुसार, ही घटना २१ मार्च रोजी संबंधित महिलेच्या घराच्या दरवाज्यापाशी घडली. महिलेनं एका फूड डिलिव्हरी अॅपवरून जेवण ऑर्डर केले होते. मागवलेले सामान घेण्यासाठी महिलेने घराचा दरवाजा उघडताच डिलिव्हरी एजंटने आपली पँट खाली करून अश्लील वर्तन केले.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने लगेचच आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला. पतीने क्षणाचाही विलंब न करता घराबाहेर धाव घेतली आणि लॉबीमध्ये लिफ्टची वाट पाहत असलेल्या त्या डिलिव्हरी एजंटला पकडले. पोलिसांनी सांगितले की, तिथे त्या दोघांमध्ये झटापट झाली, आणि आरोपीने पतीला ढकलून पळ काढला.
या घटनेनंतर संबंधित दाम्पत्याने फूड डिलिव्हरी अॅपच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून तक्रार नोंदवली होती. योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले, मात्र काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे दाम्पत्याने वी.पी. रोड पोलीस ठाण्यात अधिकृत FIR नोंदवला. तक्रार मिळताच पोलिसांनी पुढील तपास करत गावदेवी परिसरातून डिलिव्हरी एजंटची ओळख पटवून त्याला अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४ एप्रिल रोजी गावदेवीतील केनेडी ब्रिजजवळ त्याला अटक करण्यात आली. आरोपीचे नाव ‘शाहरुख शेख मोहम्मद शेख’ असून तो २९ वर्षांचा असून चेंबूरचा रहिवासी आहे. त्याच्याविरोधात BNS अंतर्गत कलम ७५ (लैंगिक छळ) आणि अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.