मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा धोका; ४२ हजार ठिकाणी सापडल्या मलेरिया, डेंग्यूच्या अळ्या; ३२ लाख ५१ हजार ६२३ घरांची तपासणी

पावसाळ्यापूर्वीच मुंबईत साथीच्या आजारांचा धोका वाढू लागला असून, जानेवारी ते २७ मेदरम्यान पालिकेने ३२ लाखांहून अधिक घरांची तपासणी केली आहे. या मोहिमेत ३७ हजार ८०० ठिकाणी डेंग्यू आणि ४ हजार ५२९ ठिकाणी मलेरियाच्या डासांच्या अळ्या आढळल्या. पालिकेकडून संबंधित ठिकाणांवरील डासांची उत्पत्तीस्थाने तत्काळ नष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा धोका; ४२ हजार ठिकाणी सापडल्या मलेरिया, डेंग्यूच्या अळ्या; ३२ लाख ५१ हजार ६२३ घरांची तपासणी
मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा धोका; ४२ हजार ठिकाणी सापडल्या मलेरिया, डेंग्यूच्या अळ्या; ३२ लाख ५१ हजार ६२३ घरांची तपासणी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी आतापासूनच मुंबईत पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी ते २७ मे या ५ महिन्यांत पालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून एकूण २२ हजार ८० परिसर भेटी देण्यात आल्या असून, ३२ लाख ५१ हजार ६२३ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३० लाख १७ हजार २२० घरांच्या परिसरात धूम्रफवारणी करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान ३७ हजार ८०० ठिकाणी डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस एजिप्ती’ डासांच्या अळ्या; तर ४ हजार ५२९ ठिकाणी हिवताप (मलेरिया) वाहक ‘ॲनॉफिलीस स्टिफेन्सी’ डासांच्या अळ्या सापडल्या. दरम्यान, डासांची उत्पत्तीस्थाने तत्काळ नष्ट करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डेंग्यू, हिवताप यांसारख्या कीटकजन्य रोगांना आळा बसावा आणि त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी पालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे करण्यात येत आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार कीटकनाशक खात्यातील कामगार -कर्मचारी, अधिकारी हे तपासणीचे लक्ष्य निर्धारित करुन सातत्यपूर्ण पद्धतीने नियमितपणे तपासणी करत आहेत.

अश्विनी भिडे या शहर व उपनगरातील विविध ठिकाणच्या पाहणी दौऱ्यात कीटकनाशक चौक्यांना विशेष भेटी देत कामकाजाचा आढावा घेत आहेत. कामगार-कर्मचारी, अधिकारी यांच्याशी संवाद साधून कार्यस्थळावरील परिस्थिती, अडचणी आणि उपाययोजनांची माहिती जाणून घेत आहेत.

कीटकनाशक खात्यातील साधारणपणे १ हजाराहून अधिक कामगार-कर्मचारी, अधिकारी हे अव्याहतपणे कार्यरत असून त्यांच्याद्वारे मुंबईच्या कानाकोपऱ्यातील विविध भागांचे आणि इमारतींच्या परिसरांचे सर्वेक्षण आणि तपासणी नियमितपणे करण्यात येत आहे.

या तपासणीदरम्यान इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर आणि त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या आणि त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांमधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात आली आहे.

डासांची संभाव्य उत्पत्ती स्थळे केली नष्ट

डासांची संभाव्य उत्पत्ती स्थळे ठरू शकणारे ५४० टायर्स आणि १ लाख १६ हजार २५१ अडगळीतील वस्तूंचे निष्कासन करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या चार हजार इमारत पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा अधिकारी यांना डास प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महापालिकेचे विविध विभाग सक्रिय

महापालिका क्षेत्रात विविध रोगांवर नियंत्रण असावे आणि रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा म्हणून सार्वजनिक आरोग्य खाते, कीटकनाशक खाते यासारखे महापालिकेचे विविध विभाग अविरतपणे कार्यरत आहेत. औषध फवारणी, धूम्र फवारणी, डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करणे, यासारख्या विविध उपाययोजना देखील महापालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत आहेत, असे भिडे यांनी नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in