
मुंबई : मुंबईत पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी नालेसफाईचे काम योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. त्यामुळे नाल्यातील गाळ उपसा कामांशी सर्व संबंधित अभियंत्यांनी फक्त कार्यालयात थांबून कामांचा आढावा घेऊ नये, तर गाळ काढण्याच्या कालावधीत प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहून कामांवर योग्य देखरेख करणे बंधनकारक आहे, सर्व नालेनिहाय व दिवसनिहाय गाळ उपशाचे नियोजन करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कंत्राटदार आणि अभियंत्यांना केले आहे.
मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून प्रमुख नाल्यांमधून गाळ उपसा करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. पूर्व उपनगरांमधील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची तसेच मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांची अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. या दौऱ्याप्रसंगी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
सर्व प्रमुख नाल्यांच्या बाबतीत गाळ उपसा करण्याचे नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावे. सर्व संबंधित अभियंत्यांनी फक्त कार्यालयात आढावा न घेता, प्रत्यक्ष कार्यस्थळी दररोज उपस्थित राहून गाळ उपसा कामांवर योग्य देखरेख करावी, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच नाल्यांमध्ये नागरिकांना घनकचरा फेकण्यापासून अटकाव करण्यासाठी आवश्यक त्या-त्या ठिकाणी नाल्याच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश देखील बांगर यांनी दिले आहेत.
घाटकोपर (पूर्व) येथे छेडा नगर जंक्शनजवळ सोमय्या नाला, कुर्ला स्थित माहूल खाडी नाला, शिवडी-चेंबूर रस्त्यावर माहूल खाडी नाला, वडाळा येथे रावळी निम्नस्तर नाला, कुर्ला (पूर्व) येथील नेहरूनगर नाला, धारावी टी जंक्शन येथे दादर-धारावी नाला आदी ठिकाणी बांगर यांनी भेट दिली. तसेच वांद्रे कुर्ला संकूल परिसरात भेट देवून मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. प्रत्येक नाल्याच्या वरील आणि खालच्या बाजूस असलेले प्रवाह, नाल्यांच्या परिसरात जोरदार पावसाच्या वेळी पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे, त्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना, या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेऊन बांगर यांनी आवश्यक ते निर्देश दिले.
धारावीतील नाल्यावर जाळ्या बसवण्याचे निर्देश
धारावी टी जंक्शन येथे दादर-धारावी नाल्याच्या एका बाजूला दुमजली घरे, दुकाने व आस्थापना आहेत. तेथून घरगुती, वाणिज्यिक कचरा नाल्यात फेकला जातो. त्यामुळे हा नाला एकदा स्वच्छ करून कार्यवाही पूर्ण होवू शकत नाही. एकापेक्षा अधिक वेळा नाला स्वच्छ करावा. गाळ तसेच तरंगता कचरा वारंवार काढावा. नाल्याच्या बाजूला घरांमधून कचरा फेकल्या जाण्याची समस्या आहे, अशा ठिकाणी जाळी बसवावी, अशी सूचना बांगर यांनी केली.
मिठी नदीतील गाळ काढण्याचे नियोजन करा!
सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या मिठी नदीतून प्रत्येक टप्प्यात किती गाळ काढणे अपेक्षित आहे, प्रत्येक टप्पा किती कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे, याचे सूक्ष्म नियोजन करावे. जिथे गाळ मोजला जातो त्या वजनकाट्यांच्या ठिकाणी पुरेशा संख्येने सीसीटीव्ही लावावेत. त्यांचा पुरेसा बॅकअप असावा. गाळ काढण्याच्या प्रत्येक सत्राचा अभिलेख (रेकॉर्ड) चोखपणे नोंदवावा सर्व कामे दिलेल्या वेळेत व पारदर्शकतेसह पूर्ण करावीत, अशा सूचना बांगर यांनी दिल्या आहेत.