
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता कोकणवासीयांसाठी रो-रो सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू करणार, असा दावा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केला. मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा सुरू करण्याची घोषणा झाली. मात्र आता रो-रो सेवा सुरू करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवेला खो मिळाला असून गणेशोत्सवातील मुहूर्त तूर्तास हुकला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात रो-रो बोटने कोकणात जाण्याचे कोकणवासीयांचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, एक दोन परवानगी येणे बाकी असून उद्यापरवापर्यंत स्पष्ट होईल, असे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दै. ‘नवशक्ति’शी बोलताना सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, खासगी बस चालकांकडून लूट, रेल्वेचे तिकीट आधीच फुल, एसटीच्या गाड्या हाऊस फुल्ल यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. कोकणवासीयांना गणेशोत्सवात जलद जाता यावे यासाठी रो-रो बोट सेवा सुरू करण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केली होती. मेरीटाइम बोर्डाच्या मदतीने रो-रो सेवा मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. रो-रो बोट सेवा सुरू झाल्यानंतर १४ तासांचा प्रवास ६ तासांत होणार असून वेळेची व पैशांची बचत होणार आहे. मात्र बाप्पाच्या आगमनाला दोन दिवस शिल्लक असून गणेशोत्सवापूर्वी रो-रो बोट सेवा सुरू करण्याचा मुहुर्त तूर्तास हुकला आहे. दरम्यान, मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी प्रदीप बढीये यांनी सांगितले की, सोमवारपर्यंत याबाबत स्पष्टता येईल.
सेवा सुरू करणे तूर्तास अशक्य!
रो-रो सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी गेल्या काही आठवड्यांपासून बैठकांवर बैठका घेत आहेत. मंत्र्यांच्या हट्टामुळे सेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्षात केंद्राच्या नौकानयन महासंचालनालयाकडून सेवा सुरू करण्यासाठी अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांत मंजुरी मिळेल, असे सांगितले.