मुंबईतील बंद हायड्रंटचे ऑडिट करा; दिक्षा कारकर यांचे आयुक्तांना पत्र

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हायड्रंट महत्वाची भूमिका बजावतात. मात्र दिवाळीच्या सणात सुमारे ५०० आगीच्या घटना घडल्या.
मुंबईतील बंद हायड्रंटचे ऑडिट करा; दिक्षा कारकर यांचे आयुक्तांना पत्र
मुंबईतील बंद हायड्रंटचे ऑडिट करा; दिक्षा कारकर यांचे आयुक्तांना पत्रसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हायड्रंट महत्वाची भूमिका बजावतात. मात्र दिवाळीच्या सणात सुमारे ५०० आगीच्या घटना घडल्या. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणारे हायड्रंट ८५ टक्के बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बंद हायड्रंटचे ऑडिट करण्याची मागणी विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.‌

मुंबईत आग लागल्यास अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाण्याचा पुरवठा तातडीने उपलब्ध होणे आवश्यक असते. मात्र, मुंबईतील फायर हायड्रंट स्थितीच चिंताजनक असल्याची बाब समोर आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील एकूण १०४४७ हायड्रंटपैकी सुमारे ९५०० हायड्रंट बंद, निकामी अथवा रस्ते आणि पदपथांखाली गाडले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. परिणामी, केवळ १५ टक्के हायड्रंट कार्यरत असल्याची माहिती पुढे आली असून, मुंबईच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दिवाळीच्या पाच दिवसांत मुंबईत आगीच्या ४९९ घटनांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाला आपत्कालीन परिस्थितीत पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी फायर हायड्रंट कार्यरत असणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मात्र, हजारो हायड्रंट बंद अथवा वापरासाठी अनुपलब्ध असल्यास आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांसमोर पाण्याच्या उपलब्धतेचे आव्हान निर्माण होऊ शकते.

या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत दिक्षा हर्षद कारकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिले आहे. महापालिकेच्या संपूर्ण हद्दीतील अग्निशमन हायड्रंटचे विभागनिहाय विशेष तांत्रिक लेखापरीक्षण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. बंद पडलेले जलस्तंभ प्राधान्याने दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करावेत, तसेच ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तेथे आधुनिक हायड्रंट बसवावेत, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. आयुक्तांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती कारकर यांनी केली आहे.

हायड्रंट सुरू राहावे

मुंबईसारख्या मोठया शहरात आग लागल्यास मुंबई अग्निशमन दलाला तात्काळ पाणी पुरवठा व्हावा म्हणून ठिकठिकाणी हायड्रंट सुरू केले होते. याचा फायदा आग विझवण्यासाठी केला जातो. त्यामुळे शहरातील नादुरुस्त हायड्रंट तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)