मुंबई: लोकसभा निवडणूक निकाला दिवशी ४ जूनला ‘ड्राय डे’ जाहीर करण्याचा दिलेला आदेश मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी मागे घेतला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दारू दुकाने खुली करता येतील, असे स्पष्ट केले. यामुळे ‘ड्राय डे’ संदर्भात निर्माण झालेला गोंधळ संपला आहे. याची दखल घेत खंडपीठाने याचिका निकाली काढली.
लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरात दारू बंदीचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ४ जून रोजी निवडणूक निकालादिवशी संपूर्ण दिवस दारू बंदीचा आदेश जारी केला आहे. या निर्णयाविरोधात आहार संघटनेने उच्च न्यायालयात ॲड. वीणा थडाणी, ॲड. विशाल थडाणी यांच्या मार्फत आव्हान देत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्या. नितीन बोरकर आणि न्या. सोमसेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील ॲड. ज्योती चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेला आदेश मागे घेत ४ जून रोजी निवडणुकीचा निकालानंतर दारू विक्री करण्यास मुभा दिली. या बरोबरच मुंबई उपनगर, रायगड जिल्ह्यातही या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले.