Mumbai : दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज नीचांकी पातळीवर; आवाज फाऊंडेशन, एमपीसीबीच्या पाहणीतील निष्कर्ष

यंदा दिवाळीत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता गेल्या २० वर्षांतील सर्वांत कमी असल्याचे आढळून आले आहे.
Mumbai : दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज नीचांकी पातळीवर; आवाज फाऊंडेशन, एमपीसीबीच्या पाहणीतील निष्कर्ष
Mumbai : दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज नीचांकी पातळीवर; आवाज फाऊंडेशन, एमपीसीबीच्या पाहणीतील निष्कर्षप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मनोज रामकृष्णन

मुंबई : यंदा दिवाळीत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता गेल्या २० वर्षांतील सर्वांत कमी असल्याचे आढळून आले आहे. ध्वनिप्रदूषणविरोधी कार्यकर्त्या सुमायरा अब्दुलअली यांच्या ‘आवाज फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) संयुक्तपणे केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे.

या चाचणीत तपासण्यात आलेल्या सर्व १७ प्रकारच्या फटाक्यांच्या आवाजाची पातळी १०० डेसिबलपेक्षा कमी नोंदविण्यात आली. ८ सप्टेंबर २००६ रोजी वडाळा ट्रक टर्मिनस येथे फटाक्यांच्या आवाजाची सर्वाधिक १४२.६ डेसिबल तीव्रता नोंदविण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा आवाजाच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे.

‘गेल्या २० वर्षांच्या तुलनेत हा मोठा बदल आहे,’ अशी प्रतिक्रिया आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलअली यांनी दिली.

गुरुवारी चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या (आरसीएफ) मैदानावर ही चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये आघाडीच्या फटाका उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांची ध्वनी पातळी, रासायनिक घटकांची माहिती आणि अनिवार्य क्यूआर कोड यांसह पर्यावरणविषयक नियमांचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी करण्यात आली.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (सीएसआयआर-नीरी) निश्चित केलेल्या ‘ग्रीन क्रॅकर्स’च्या निकषांनुसार फटाक्यांची ध्वनी पातळी, रासायनिक संरचना आणि पॅकेजिंगवरील माहितीची सत्यता तपासण्यात आली.

काही फटाक्यांची ध्वनी पातळी तुलनेने कमी असली, तरी अनेक नामांकित ब्रँडच्या पॅकेजिंगवर आवाजाची अनिवार्य मर्यादा नमूद करण्यात आलेली नसल्याचे आढळले. जंगल, सेव्हन्थ सेन्स, सोलर लेझर, पॉवर पॉइंट (पायरोटेक्निक्स), ट्राय कलर फाऊंटन्स आणि १०के या लोकप्रिय ब्रँडच्या फटाक्यांच्या पाकिटांवर डेसिबल मर्यादेची नोंद नव्हती. तपासणी केलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या पातळीत मोठी तफावत आढळली. १०के या ब्रँडच्या फटाक्यांचा आवाज सर्वाधिक ९९.३ डेसिबल नोंदविण्यात आला. त्याखालोखाल भाविकजी आणि मर्क्युरी अकिलीस या दोन्ही ब्रँडच्या फटाक्यांची ध्वनी पातळी ९८.७ डेसिबल होती. तुलनेने कमी आवाज करणाऱ्या टिम टिम डिलक्स फ्लॉवर पॉट या फटाक्यांची ध्वनीपातळी ६१.१ ते ७२.३ डेसिबलदरम्यान होती.

फटाक्यांतील रासायनिक घटकात विविधता

फटाक्यांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक घटकांमध्येही विविधता आढळली. बहुतांश फटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेट, गंधक आणि ॲल्युमिनियम पावडर यांसारख्या ऑक्सिडायझर आणि इंधन घटकांचा वापर करण्यात आला होता. याशिवाय विशिष्ट दृश्य परिणाम आणि रंग निर्माण करण्यासाठी सोडियम नायट्रेट, स्ट्रॉन्शियम नायट्रेट, मॅग्नालियम आणि बिस्मथ ऑक्साइड यांसारख्या रसायनांचाही वापर करण्यात आला होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)