

मुंबई : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईतील फटाक्यांच्या बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर निर्बंध घातले असून, मुंबई महापालिकेनेही सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडू नयेत, असे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे मस्जिद बंदर येथील ईसाभाई फायर वर्क्स या फटाक्यांच्या दुकानात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. त्यामुळे फटाक्यांवरील निर्बंधांची अंमलबजावणी नेमकी कितपत होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवाळीत फटाके फोडण्याची परंपरा आणि उत्साह यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी करत आहेत. मात्र, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात धूर आणि सूक्ष्म प्रदूषकांचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. मुंबईसारख्या आधीच प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या शहरात फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता आहे. याचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच श्वसनविकार असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर होऊ शकतो.
दरम्यान, दिवाळी सण वर्षातून एकदा येतो. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी सणात ग्राहकांचा उत्साह कायम आहे, असे ईसाभाई फायर वर्क्सच्या प्रतिनिधींनी सांगितले.
निर्बंधांचे पालन गरजेचे
फटाके फोडण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली असून सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडू नका, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. दिवाळीचा आनंद साजरा करताना इतरांच्या आरोग्याचा, शांततेचा आणि पर्यावरणाचा विचार केला, तरच हा सण खऱ्या अर्थाने आनंददायी ठरेल.
मुले, रुग्ण, ज्येष्ठांना होतो आवाजाचा त्रास
फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः लहान मुले, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना या आवाजाचा त्रास होतो. तसेच, भटकी कुत्री, मांजर आणि इतर प्राणी फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे भयभीत होतात. अनेकदा घाबरलेले प्राणी रस्त्यावर सैरावैरा धावू लागतात, ज्यामुळे अपघातांचाही धोका निर्माण होतो.
नागरिकांनीही फटाके फोडणे टाळावे
मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी फटाके न फोडण्याचे आवाहन केले जात असले, तरी बाजारातील गर्दी आणि फटाक्यांच्या खरेदीचा उत्साह पाहता जनजागृतीपुरतेच हे प्रयत्न मर्यादित राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांनीही पर्यावरण आणि आरोग्याचा विचार करून फटाक्यांचा वापर टाळणे किंवा मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.