Mumbai : खणाच्या साडीचे कंदील वेधताहेत लक्ष; कंदील गल्ली सजली, ‘स्वामी’ कंदिलांनाही बाजारात मागणी

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईतील कंदील बाजार सजला आहे.
Mumbai : खणाच्या साडीचे कंदील वेधताहेत लक्ष; कंदील गल्ली सजली, ‘स्वामी’ कंदिलांनाही बाजारात मागणी
Mumbai : खणाच्या साडीचे कंदील वेधताहेत लक्ष; कंदील गल्ली सजली, ‘स्वामी’ कंदिलांनाही बाजारात मागणीसंग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईतील कंदील बाजार सजला आहे. माहीम सिटी लाईट येथील कंदील गल्लीमध्ये विविध रंगांचे, आकारांचे आणि आकर्षक नक्षीकाम असलेले कंदील विक्रीसाठी आले आहेत. यंदा प्रथमच खणाच्या साडीपासून तयार केलेले कंदील विशेष लक्ष वेधून घेत आहेत. तर ‘स्वामी’ असे लिहिलेल्या कंदिलांनाही बाजारात मोठी मागणी आहे.

गणेशोत्सव संपताच कंदील बनविण्याच्या कामाला सुरुवात होते. माहीम कवळेवाडीतील अनेक मराठी कुटुंबे कंदील बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय करत आहेत. कंदिलांची रचना, रंगसंगती, सजावट आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांची निर्मिती केली जाते. त्यामुळे दरवर्षी बाजारात नवनवीन प्रकारचे कंदील पाहायला मिळतात.

नाविन्यपूर्ण प्रकारांनाही ग्राहकांची पसंती

यंदा खणाच्या साडीचा वापर करून बनविण्यात आलेले कंदील आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. पारंपरिक साडीच्या कापडामुळे या कंदिलांना वेगळे रूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर ‘स्वामी’ असे लिहिलेले कंदीलही बाजारात उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक कंदिलांसोबतच अशा नाविन्यपूर्ण प्रकारांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

आकार आणि सजावटीनुसार दर

कवळेवाडीतील या कंदील गल्लीत सुमारे १६ मराठी कारागीर आणि व्यावसायिक हे कंदील बनविण्याचा व विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या हाताला दिवाळीच्या हंगामात काम मिळते. कंदिलांच्या आकारानुसार आणि सजावटीच्या प्रकारानुसार दर निश्चित केले जातात. येथे ९० रुपयांपासून ते २२०० रुपयांपर्यंतचे कंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कंदील गल्ली ग्राहकांच्या स्वागताला सज्ज

दिवाळीत घराच्या दारात आणि अंगणात कंदील लावण्याची परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे पारंपरिक कंदिलांसह आधुनिक डिझाइनच्या कंदिलांनाही मागणी असते. रंगीबेरंगी कंदिलांनी सजलेली कंदील गल्ली आता ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

गणेशोत्सव संपताच कंदील बनविण्याचे काम सुरू होते. यंदा प्रथमच खणाच्या साडीपासून कंदील बनवले आहेत. येथे ९० रुपयांपासून ते २२०० रुपयांपर्यंत कंदील उपलब्ध आहेत. आमची चौथी पिढी हा व्यवसाय करत आहेत. नोकरी सांभाळून हे काम सर्व जण करतात. कंदील गल्लीमध्ये स्वस्तात कंदील मिळत असल्याने मुंबईतील विविध भागांतून लोक येथे खरेदीसाठी येतात.

दीपक कोरे, कंदील विक्रेते

logo
marathi.freepressjournal.in