Mumbai : फोर्टचा ऐतिहासिक वारसा अधिक खुलणार; डी. एन. रोडचे होणार सुशोभीकरण, CSMT-क्रॉफर्ड जंक्शन पदपथ नूतनीकरण

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फोर्ट परिसरातील फुटपाथाचा कायापालट होणार आहे.
Mumbai : फोर्टचा ऐतिहासिक वारसा अधिक खुलणार; डी. एन. रोडचे होणार सुशोभीकरण, CSMT-क्रॉफर्ड जंक्शन पदपथ नूतनीकरण
Mumbai : फोर्टचा ऐतिहासिक वारसा अधिक खुलणार; डी. एन. रोडचे होणार सुशोभीकरण, CSMT-क्रॉफर्ड जंक्शन पदपथ नूतनीकरण
Published on: 

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फोर्ट परिसरातील फुटपाथाचा कायापालट होणार आहे. डी. एन. रोडचे सुशोभीकरणासह सुमारे दीड किलोमीटर लांब सीएसएमटी ते क्रॉफर्ड जंक्शनदरम्यान पदपथांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका १३ कोटी ६६ लाख ९५ हजार २३६ रुपये खर्च करणार आहे.

जहांगीर आर्ट गॅलरी समोरच्या फुटपाथला नवा साज दिला,त्याच धर्तीवर फोर्ट परिसरातील फुटपाथाचा कायापालट करण्यात येणार आहे.

मुंबईतील ऐतिहासिक फोर्ट परिसराचा वारसा अधिक ठळकपणे समोर आणण्यासाठी मुंबई महापालिकेच्या 'ए' विभागाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे.

फोर्ट हेरिटेज परिसरातील ऐतिहासिक इमारतींची दृश्यमानता वाढविणे, पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सुटसुटीत मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरी रचनेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने डी. एन. रोडच्या सुशोभीकरणाची आणि पुनर्रचनेची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

पदपथांची रचना अधिक नियोजनबद्ध

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते क्रॉफर्ड जंक्शन या मार्गावर डी. एन. रोडलगतच्या पदपथांचे पुनर्भियांत्रिकीकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे पदपथांची रचना अधिक नियोजनबद्ध होण्याबरोबरच पादचाऱ्यांना ये-जा करताना सुलभता मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः फोर्ट परिसरातील ऐतिहासिक इमारती, वास्तू आणि त्यांचा स्थापत्य वारसा नागरिक तसेच पर्यटकांना अधिक स्पष्टपणे पाहता यावा, यासाठी दृश्यमानता सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.

पादचाऱ्यांना दिलासा

या प्रकल्पांतर्गत केवळ सुशोभीकरण न करता नागरी रचनेत आवश्यक सुधारणा, पदपथांचे पुनर्स्थापन आणि तीन वर्षांसाठी सर्वसमावेशक परिरक्षण व देखभालीची कामेही करण्यात येणार आहेत. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता आणि देखभाल कायम राखण्याची जबाबदारीही महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकल्पामुळे फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक नागरी सुविधा यांचा समतोल साधला जाणार का, तसेच पादचाऱ्यांना प्रत्यक्षात किती दिलासा मिळणार, हे कामाच्या अंमलबजावणीनंतर स्पष्ट होईल.

वर्दळीची जागा

फोर्ट परिसर हा मुंबईच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसरात दररोज हजारो नागरिक, कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी आणि पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, वाढती वाहतूक, पादचारी मार्गांवरील अडथळे आणि नागरी सुविधांच्या नियोजनातील त्रुटींमुळे या परिसरातील ऐतिहासिक सौंदर्याचा अनुभव घेण्यात मर्यादा येतात. त्यामुळे पदपथांची सुधारणा आणि पादचारीकरणाला प्राधान्य देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)