मुंबईतील दोन्ही डॉपलर रडार यंत्रणा ठप्प; पावसाचा अचूक अंदाज घेण्यात अडचण; कुलाब्यातील यंत्रणा १५ दिवसांपासून बंद

अतिवृष्टी, ढगांची हालचाल, चक्रीवादळ याचा अचूक अंदाज घेण्यासाठी ‘डॉपलर रडार’ यंत्रणा खूप महत्त्वपूर्ण आहे. हवामान विभागाने मुंबईसह परिसरात 'ऑरेंज अलर्ट' जारी केले असताना मुंबईत सद्य:स्थितीत कुलाबा येथील व जोगेश्वरी वेरावली येथील ‘सी-बँड’ असे दोन्ही ‘डॉपलर रडार’ यंत्रणा बंद पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
मुंबईतील दोन्ही डॉपलर रडार यंत्रणा ठप्प; पावसाचा अचूक अंदाज घेण्यात अडचण; कुलाब्यातील यंत्रणा १५ दिवसांपासून बंद
मुंबईतील दोन्ही डॉपलर रडार यंत्रणा ठप्प; पावसाचा अचूक अंदाज घेण्यात अडचण; कुलाब्यातील यंत्रणा १५ दिवसांपासून बंद संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : अतिवृष्टी, ढगांची हालचाल, चक्रीवादळ याचा अचूक अंदाज घेण्यासाठी ‘डॉपलर रडार’ यंत्रणा खूप महत्त्वपूर्ण आहे. हवामान विभागाने मुंबईसह परिसरात 'ऑरेंज अलर्ट' जारी केले असताना मुंबईत सद्य:स्थितीत कुलाबा येथील व जोगेश्वरी वेरावली येथील ‘सी-बँड’ असे दोन्ही ‘डॉपलर रडार’ यंत्रणा बंद पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या कोणतेही हवामान रडार कार्यरत नसल्याने अचूक आणि तत्काळ पावसाचा अंदाज वर्तविण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

कुलाबा येथील ‘डॉपलर रडार’ गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे, तर जोगेश्वरीतील वेरावली येथील ‘सी-बँड रडार’ रविवारी सायंकाळी बंद पडल्याने मुंबईची रडार यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

‘आयएमडी’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही रडारमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून त्या दूर करण्याचे काम सुरू आहे. वेरावली रडारबाबत दिल्ली येथील मुख्य कार्यालयालाही माहिती देण्यात आली आहे.

२६ जुलैच्या महापुरानंतर रडार यंत्रणा कार्यान्वित

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत झालेल्या महापुरानंतर हवामानाचा अधिक अचूक अंदाज मिळावा म्हणून ‘डॉपलर वेदर रडार’ प्रणाली उभारण्यात आली होती. त्या दिवशी मुंबईत तब्बल ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. कुलाबा येथील ‘एस-बँड रडार’ सुमारे ५०० किलोमीटर परिसरातील हवामानावर लक्ष ठेवते. मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाचा अचूक मागोवा घेण्यासाठी हे रडार उपयुक्त मानले जाते. तर जोगेश्वरीतील वेरावली येथील ‘सी-बँड रडार’ची क्षमता सुमारे ४०० किलोमीटरपर्यंत असून ते ‘एक्स-बँड’ आणि ‘एस-बँड’ रडारमधील समतोल पर्याय मानले जाते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in