Mumbai : हुंडाबळी, आत्महत्या घटल्या; मात्र, छळाच्या घटनांमध्ये झाली वाढ

मुंबईत विवाहित महिलांचा हुंड्यासाठी होणारा शारीरिक आणि मानसिक छळ वाढल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत अशा गुन्ह्यांमध्ये ५.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Mumbai : हुंडाबळी, आत्महत्या घटल्या; मात्र, छळाच्या घटनांमध्ये झाली वाढ
Mumbai : हुंडाबळी, आत्महत्या घटल्या; मात्र, छळाच्या घटनांमध्ये झाली वाढ'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

अवधूत खराडे/मुंबई

मुंबईत विवाहित महिलांचा हुंड्यासाठी होणारा शारीरिक आणि मानसिक छळ वाढल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत अशा गुन्ह्यांमध्ये ५.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या ३० जूनपर्यंत हुंड्यासाठी केल्या जाणाऱ्या छळाचे २६० गुन्हे नोंदवले गेले आहेत जे २०२५ मधील याच कालावधीत २४६ इतके होते.

छळाच्या प्रकरणात १४ गुन्ह्यांची वाढ झाली असली तरी, हुंडाबळी आणि छळाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. तसेच दोन्ही वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत हुंड्यासाठी हत्येची एकही नोंद झालेली नाही.

हुंडाबळी आणि आत्महत्येच्या घटनांमधील घट दिलासादायक असली, तरी हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या तक्रारी वाढणे हे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेबाबत अद्यापही गंभीर आव्हान असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी गुन्ह्यांची नोंद करून त्यावर वेळोवेळी योग्य ती कारवाई केली जाते. त्यामुळे काही प्रमाणात वचक निर्माण होतो. पोलिसांकडूनही वेळोवेळी योग्य त्या प्रकारे लोकांचे समुपदेशन केले जात असते.

हुंडा छळाचे १४ अतिरिक्त गुन्हे नोंद

भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ४९८-अ आणि नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ८५ अंतर्गत नोंदवल्या जाणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाच्या घटना वाढणे हा चिंतेचा विषय ठरला आहे. २०२५ च्या पहिल्या ६ महिन्यांत २४६ गुन्हे नोंदवले गेले होते, तर यंदा ही संख्या २६० वर पोहोचली आहे. यांपैकी १६ गुन्ह्यांची उकल करणे अजून बाकी आहे.

कमी प्रकरणांची झाली नोंद

हुंड्यासाठी केल्या जाणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. यंदा ३० जूनपर्यंत ३ प्रकरणांची नोंद झाली, तर गेल्या वर्षी याच कालावधीत ५ गुन्हे नोंदवले गेले होते. बीएनएस कलम ८०(२) अंतर्गत नोंदवल्या जाणाऱ्या हुंडाबळीच्या प्रकरणांमध्येही घसरण झाली आहे. २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत १ हुंडाबळीची नोंद झाली, तर २०२५ मध्ये ही संख्या ३ होती. २०२५ आणि २०२६ या दोन्ही वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत हुंड्यासाठी हत्येचा एकही गुन्हा नोंद झालेला नाही.

इतर गुन्ह्यांमध्येही घट

पोलिसांच्या आकडेवारीनुसार विवाहित महिलांवरील इतर गुन्ह्यांचा आलेखही खाली आला आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या सत्रात ८ महिलांची हत्या झाली होती, यंदा हे प्रमाण ४ वर आले आहे. कौटुंबिक किंवा इतर कारणांमुळे महिलांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण ९ वरून ६ वर आले आहे. हुंड्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी महिलांचा होणारा छळ २५३ वरून २२७ वर घसरला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in