Mumbai : नालेसफाईचे काम अनुभव नसलेल्या कंत्राटदारांनाही; नालेसफाई रखडल्यामुळे महापौरांचा अजब निर्णय

पावसाळा सुरू होण्यास दोन ते अडीच महिने बाकी असतानाही नालेसफाईचे काम सुरू झालेले नाही. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने मुदत १७ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. गरज पडल्यास अनुभव नसलेल्या कंत्राटदारांनाही हे काम देण्यात येईल, अशी माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.
नालेसफाईचे काम अनुभव नसलेल्या कंत्राटदारांनाही; नालेसफाई रखडल्यामुळे महापौरांचा अजब निर्णय
नालेसफाईचे काम अनुभव नसलेल्या कंत्राटदारांनाही; नालेसफाई रखडल्यामुळे महापौरांचा अजब निर्णयप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : वरुणराजाच्या आगमनाला दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी असून अद्याप नालेसफाईचे कामास सुरुवात झालेली नाही. मिठी नदीतील गाळ उपसा काढण्यासाठी निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे मिठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी निविदा प्रक्रियेला १७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी नाल्यातील गाळ काढण्यासाठी अनुभव नसलेल्या कंत्राटदारांनाही काम देण्यात येणार असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली. दरम्यान, नालेसफाई किती झाली, किती गाळ काढला याची माहिती मुंबईकर, नगरसेवकांना मिळावी, यासाठी नाल्याशेजारी डॅश बोर्ड लावण्याची सूचना दिल्याचे महापौरांनी सांगितले.

नालेसफाईच्या कामात वेठीस धरू पाहणाऱ्या कंत्राटदारांना न जुमानता महापालिकेने मिठी नदी, नालेसफाईच्या कामांसाठी आवश्यक त्या ठिकाणी काही जाचक अटी-शर्ती शिथिल करून अनुभव नसलेल्या नवीन कंत्राटदारांनाही नालेसफाई कामाची संधी देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली तसेच नालेसफाईची कामे रखडवल्यास कंत्राटदारावर संबंधित गुन्हा दाखल करण्यात येईल व त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौर तावडे यांनी दिला.

नगरसेवकांचा नालेसफाईवर वॉच

मुंबईतील प्रमुख नाले व लहान नाले यातून गाळ काढण्याची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधनांचा प्रभावीपणे वापर करावा. प्रशासकीय विभाग कार्यालय आणि मध्यवर्ती यंत्रणा यांच्यात समन्वय राखून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत.

लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांना प्रत्येक कामाच्या टप्प्याची नियमित माहिती द्यावी. ज्या नाल्यांची स्वच्छता सुरू आहे त्या ठिकाणी संबंधित नाल्याची लांबी-रुंदी, गाळ काढण्याचे परिमाण, कालावधी, कंत्राटदाराचे नाव आणि संबंधित अभियंत्याचा संपर्क क्रमांक इत्यादींची माहिती दर्शवणारा फलक कार्यस्थळी लावावा. नाल्यातून काढलेल्या गाळाची ४८ तासांत योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.

नाले स्वच्छतेच्या कामात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढण्यापासून ते क्षेपणभूमीवर त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांचे छायाचित्रण, चित्रीकरण अनिवार्य करावे, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.

४८ तासांत गाळ उचलावा - उपमहापौर

आवश्यक मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी कंत्राटदारांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत सुरू करावी, पालिका अभियंत्यांनी या कामाचे परीक्षण करावे, गाळ हा नाल्यालगत तसाच अनेक दिवस न ठेवता ४८ तासांत उचलावा, या कामात आम्ही विरोधकांनाही सोबत घेऊन काम करणार आहोत, अशी माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली.

नगरसेवक नालेसफाईची झाडाझडती घेणार

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. परंतु प्रत्यक्षात किती कामे सुरू, किती गाळ उपसा केला, याची खात्री करण्यासाठी भाजप नगरसेवक प्रत्यक्ष स्थळी जाऊन पहाणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

२० वॉर्डात जुन्याच कंत्राटदारांकडून नालेसफाई

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. मिठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली असून १७मार्चपर्यंत निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. परंतु झोन २, ४ व ६ मध्ये नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे, तर झोन ३ व ५ साठी निविदा प्रक्रिया लाइव्ह असून २४ पैकी २० वॉर्डात जुन्याच कंत्राटदारांकडून नालेसफाईची कामे सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in