

मुंबई : पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्प असलेल्या आनंदनगर ठाणे ते छेडानगर घाटकोपर यांना जोडणाऱ्या १३.९ किमी लांबीच्या प्रकल्पाने गती घेतली आहे. पूर्व द्रूतगती महामार्गावर सेगमेंट लाँचरचे प्रत्येकी ५९ मीटर लांबीचे आणि १६० मेट्रिक टन वजनाचे मुख्य गर्डर लाँचरचे दोन भाग मंगळवारी यशस्वीरित्या उभारण्यात आले. हे काम अवघ्या ४ तासांत काम पूर्ण करण्यात आले.
पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्प म्हणजे आनंदनगर, ठाणे ते छेडानगर, घाटकोपर यांना जोडणारा १३.९ किमी लांबीचा, पूर्णपणे उन्नत ६-पदरी हायस्पीड कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर आनंदनगर पासून मुलुंड, ऐरोली, जेव्हीएलआर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपरमार्गे जाईल आणि शेवटी छेडानगर येथे संपेल. पूर्व द्रूतगती महामार्गावरील होणाऱ्या वाहतूककोंडीवर त्यामुळे नियंत्रण होण्यास मदत होऊन प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास हा अवघ्या २५-३० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक वेगवान होण्यासोबतच मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक सक्षम होईल.
प्रीकास्ट सेगमेंट्सची टप्प्याटप्प्याने उभारणी
मुख्य गर्डर लाँचरची उभारणी पूर्ण झाल्यानंतर सेगमेंट लाँचरद्वारे आता १,६३२ प्रीकास्ट सेगमेंट्सची टप्प्याटप्प्याने उभारणी केली जाणार आहे. प्रत्येक सेगमेंटचे वजन सुमारे ९० मेट्रिक टन असून त्याद्वारे २५ मीटर रुंदीच्या सिंगल-सेल सेगमेंट सुपर स्ट्रक्चरची उभारणी केली जाईल. यामुळे व्हायाडक्टच्या बांधकामाला वेग येणार आहे.