
मुंबई : अनंत चतुर्दशीपूर्वी ईद-ए-मिलाद असल्याने राज्य सरकारने मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टीमध्ये बदल केला आहे. वार्षिक सुट्ट्या जाहीर करताना शुक्रवारी, ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर केली होती. मात्र, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात आता ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारी ८ सप्टेंबरला दिली जाणार आहे, असे राज्य सरकारने गुरुवारी जाहीर केले. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. ईद ए मिलादची मिरवणूक आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गणपती विसर्जन असल्याने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढणार होता. यासंदर्भात २१ ऑगस्ट रोजी मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. सामाजिक सौहार्दता राहावी आणि शांततेत उत्सव पार पडावा म्हणून मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींनी ईद ए मिलादची सुट्टी पुढे ढकलण्याला संमती दिली.
शनिवार, ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्यादिवशी मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली जाते. त्यामुळे राज्यात ऐक्य व सलोखा टिकवण्यासाठी मुस्लीम समाजातील प्रमुखांनी हिंदू - मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच सरकारने ५ सप्टेंबरला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून ८ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
सुट्टीचा बदल कुठे लागू - मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ८ सप्टेंबर रोजी असेल, इतर सर्व जिल्ह्यांसाठी मात्र यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ५ सप्टेंबर रोजीच सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात व राज्यातील इतर जिल्ह्यांतील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी बंद राहतील.