Mumbai : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५०० रुपये दंड; विभागीय शिस्तभंगाचीही कारवाई होणार
मुंबई : मुंबई महापालिका तयारीसाठी निवडणुकीच्या आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रशिक्षणाला वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहिलेल्या ४ हजार ५२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दंडात्मक तसेच पोलीस कारवाईचा सामोरे जावे लागणार आहे. या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा आर्थिक दंड भरावा लागणार असून संबंधितांवर विभागीय शिस्तभंगाची कारवाई होण्याचीही शक्यता आहे.
निवडणूक ही संविधानिक व कायदेशीर जबाबदारी असून त्यात कसूर करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात संबंधित विभागांना लवकरच पालिकेकडून अधिकृत पत्रे पाठवण्यात येणार आहेत. या कारवाईत मुंबई महापालिकेसह राष्ट्रीयीकृत बँका, बेस्ट, बीएसएनएल, एचपीसीएल, विमा कंपन्या, एलआयसी, म्हाडा, एमटीएनएल, टपाल खाते, रेल्वे, आरसीएफ, नाबार्ड इत्यादी शासकीय, निमशासकीय व सार्वजनिक उपक्रमांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
इशारा दिल्यानंतरही राहिले गैरहजर
मुंबईतील एकूण मतदारसंख्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ इतकी असून, १५ जानेवारी रोजी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासली. पालिकेने निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण वेळेत पूर्ण केले होते. मात्र प्रशिक्षणाला उपस्थित राहणे बंधनकारक असतानाही तब्बल ४,५२१ कर्मचारी प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिले. या कर्मचाऱ्यांना १० जानेवारीपर्यंत अंतिम संधी देण्यात आली होती. तरीही गैरहजेरी कायम राहिल्याने प्रशासनाला तीव्र मनुष्यबळाची कमतरता जाणवली.

