
मुंबई : परळ व प्रभादेवीला जोडणारा महत्वाचा एल्फिन्स्टन उड्डाणपूल बंद करण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. रहिवाशांचे पुनर्वसन, पादचारी पुलाची उभारणी आणि नवीन पूल उभारणीचा निश्चित कालावधी जाहीर करण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. या मागण्यांबाबत सोमवारी मुख्यमंत्री किंवा एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत एका शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत पूल बंद करण्याचा तिढा सोडविण्यात येणार आहे.
दरम्यान, रहिवाशांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिले. परळ व प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूर्व-पश्चिमेला जोडणारा एल्फिन्स्टन पूल तोडून त्याठिकाणी नवीन पूल तसेच शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी एल्फिन्स्टन पुलावरून जाणारी वाहतूक शुक्रवारी रात्री ९ वाजेपासून बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला होता.
या निर्णयानुसार वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी रात्री एल्फिन्स्टन पूल बंद करण्यासाठी बॅरिकेटिंग लावण्याचे काम हाती घेतले. यावेळी स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत बॅरिकेटिंग लावण्यास विरोध केला. वाहतूक पोलिसांनी लावलेला पूल बंदचा फलक आंदोलकांनी काढून टाकला. एल्फिन्स्टन जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा, पूर्व-पश्चिम जाण्यासाठी पादचारी पुलाचे काम अगोदर पूर्ण करा आणि नवीन पूल उभारणीचा निश्चित कालावधी जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी रहिवाशांनी पूल बंद करण्यास विरोध केला.
अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री किंवा एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले आहे. त्यानुसार शिष्टमंडळाची बैठक सोमवारी होणार असल्याचे मनसेचे प्रभाग क्रमांक १९५ चे शाखा अध्यक्ष मंगेश कसालकर यांनी सांगितले.
नागरिकांच्या हरकतीप्रमाणे निर्णय नाही
पूल बंद करण्यासाठी वाहतूक विभागाने नागरिकांकडून हरकती सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार ५ हजार नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत. मात्र या हरकतींबाबत वाहतूक पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात येत नाही. पूल बंद करण्यासाठी नागरिकांच्या हरकती विचारात घेण्यात आल्या नसल्याचा आरोप मनसेचे शाखा अध्यक्ष मंगेश कसालकर यांनी केला आहे.