मुंबई : माजी नगरसेवकांना आमदारकीची स्वप्ने; उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी

विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मिळावी यासाठी विद्यमान आमदार व इच्छुक उमेदवारांनी पक्ष श्रेष्ठीकडे मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
मुंबई : माजी नगरसेवकांना आमदारकीची स्वप्ने; उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी
Published on

मुंबई : विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मिळावी यासाठी विद्यमान आमदार व इच्छुक उमेदवारांनी पक्ष श्रेष्ठीकडे मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. तर माजी नगरसेवकही उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहेत, माजी नगरसेवक आमदारकीसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावत आहेत.

शिवसेनेचे (ठाकरे गट), एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या माजी नगरसेवकांनी तिकीटासाठी मर्जीतील वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारासाठी साकडे घातले आहे. महायुती असो वा महाविकास आघाडी, यांच्यातच उमेदवारी निश्चित होत नसताना माजी नगरसेवक विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.

नगरसेवक पदाचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर अडीच वर्षात नगरसेवक पदाच्या निवडणुका झाल्याच नाहीत. त्यामुळे या नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. मात्र राजकीय वाद, न्यायप्रविष्ट प्रकरण यामुळे नगरसेवक पदाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. अडीच वर्षांचा कालावधी उलटला तरी नगरसेवकपदाच्या निवडणुका होत नसल्याने माजी नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. यात ठाकरे यांच्या शिवसेनेसह शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत एकनाथ शिंद यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे विशेष करून दोन्ही शिवसेनेतील माजी नगरसेवक विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. महायुती असो वा महाविकास आघाडी संबंधित पक्ष किती माजी नगरसेवकांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल.

शिंदे गटाला मतदारसंघ मिळाल्यास तृष्णा विश्वासराव आग्रही

वडाळा विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १७९ मधून तृष्णा विश्वासराव या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नगरसेवक म्हणून चार वेळा निवडून आल्या. मात्र २०१७ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर ठाकरे यांनी तृष्णा विश्वासराव यांना नामनिर्देशित नगरसेवक म्हणून संधी दिली. मात्र त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांमध्ये तृष्णा विश्वासराव आग्रही आहेत, वडाळा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ही जागा मिळाली तर नक्की उमेदवारी मिळावी यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली तर निवडणुकीत नक्की उतरणार, असे माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी दैनिक नवशक्ति' ला सांगितले.

ठाकरेंनी संधी दिली तर रिंगणात उतरणार - राजुल पटेल

राजुल पटेल या वर्सोवा विधानसभा क्षेत्रात कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी त्याही इच्छुक आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संधी दिली तर शंभर टक्के विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी दैनिक नवशक्ति' ला सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in