
मुंबई : मुंबईचा शतकानुशतके जुना पाककृती इतिहास जपण्यासाठी लाकूड-भट्टीच्या ओव्हन वापरणाऱ्या इराणी कॅफे/बेकरींना वारसा दर्जा देण्याची मागणी कुलाब्याचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. तर इराणी बेकर्स असोसिएशनने नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात लाकूड आणि कोळशा भट्टीच्या वापरावरील बंदी लागू केल्यास वडा पावसाठी आवश्यक असलेल्या पावाच्या पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे. तसेच इराणी कॅफे आणि बेकरींविरुद्ध कारवाई थांबवण्यासाठी पालिकेला तत्काळ सूचना द्यावेत असेही नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
पाव हे वडासोबत जाणारे एकमेव पूरक उत्पादन आहे हे सर्वज्ञात आहे. वडा पाव हा प्रत्येक मुंबईकराची मूलभूत गरज बनला आहे आणि त्याच्या पुरवठ्यातील कोणताही अडथळा अनपेक्षित भयंकर परिस्थिती निर्माण करेल, असे इराणी बेकर्स असोसिएशनने नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या विषयाला अनुसरून नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या शहराच्या खाद्य संस्कृती आणि इतिहासाचा दीर्घकाळ आधारस्तंभ राहिले आहेत त्या दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित इराणी कॅफे आणि बेकरीवर होणार आहे. हे कॅफे आणि बेकरी एका शतकाहून अधिक काळापासून मुंबईत अस्तित्वात आहेत आणि ते वापरत असलेले लाकडापासून बनवलेले ओव्हन त्यांच्या वारशाचा अविभाज्य भाग आहेत. या कॅफे ज्या बेक्ड पदार्थांसाठी ओळखले जातात त्यांची विशिष्ट चव आणि सुगंध लाकूड आणि कोळशावर आधारित वापरल्या जाणाऱ्या ओव्हनचा थेट परिणाम आहे. लाकूड किंवा कोळसा नसलेले ओव्हन पिढ्यानपिढ्या जपलेल्या पाककृतीची चव बदलतील, असे मकरंद नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच लाकूड आणि कोळशाच्या वापरावरील ओव्हनला बंदीतून सूट देऊन या इराणी कॅफे/बेकरीना वारसा दर्जा देण्याची मागणी नार्वेकर यांनी केली आहे.