Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक
Published on

मुंबई : स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, सोयी-सुविधा आणि श्रीगणेशमूर्ती विसर्जनाबाबत केलेल्या विविध उपाययोजनांची देशभरातील १३ वरिष्ठ वरिष्ठ महसुली अधिकारी (आयआरएस) आणि तज्ज्ञांच्या अभ्यास पथकाने पाहणी केली. श्रीगणेशोत्सव विसर्जनासाठी करण्यात येणारे प्रत्यक्ष नियोजन, समन्वय व व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अभ्यास करत या चोख नियोजनासाठी त्यांनी महापालिका, मुंबई पोलीस आणि अन्य संबंधित यंत्रणांचे कौतुक केले.

सार्वजनिक धोरण व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन, नागरी प्रशासन व अंमलबजावणी याविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मुंबई यांच्याकडून याचे आयोजन करण्यात आले होते.

अशी केली जाते व्यवस्था

मुंबईत सर्वाधिक श्रीगणेशमूर्ती विसर्जन हे स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे होते. श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येथे २० मनोरे, १२ कृत्रिम तलाव, ९० प्रसाधनगृहे, २२ तराफे, ११९४ जर्मन/स्टील प्लेट, २२ निर्माल्य कलश, एक प्राथमिक आरोग्य केंद्र, ५४८फ्लड लाईट, ११ सर्च लाईट, ३ रुग्णवाहिका आणि १ हजार मनुष्यबळ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सज्ज ठेवण्यात आले आहेत. महानगरपालिकेकडून या उत्सवासाठी साधारण ३ महिने आधीपासून पूर्वतयारी केली जाते. स्वराज्यभूमीवरील वाळूमध्ये विसर्जनासाठी येणाऱ्या गाड्या अडकू नयेत म्हणून सुमारे १,२०० लोखंडी प्लेट्स टाकण्यात आल्या आहेत. ६ फुटांपर्यंतच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र कृत्रिम तलाव, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरती शौचालये, सुसज्ज आरोग्य कक्ष, जीवरक्षक आणि अहोरात्र स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. यासह अन्य विविध कार्यवाहीची माहिती साळुंके यांनी अभ्यास पथकास दिली.

आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची पाहणी

प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन विभाग) रश्मी लोखंडे यांनी बृहन्मुंबईतील सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि श्रीगणेश विसर्जन व्यवस्थापन याविषयी सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी नियंत्रण कक्षाची प्रत्यक्ष कार्यपद्धती, विविध शासकीय यंत्रणांमधील आंतरसंस्थात्मक समन्वय, भाविकांच्या अथांग जनसागराचे नियोजन, वाहतूक नियमन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था, पर्यावरणपूरक उपाययोजना तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजना, गर्दीचे सूक्ष्म नियोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर आणि गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी केलेली खबरदारी याविषयी सहायक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांनी माहिती दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in