'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

राज्यातून मान्सून पूर्णपणे परतल्यानंतर आता हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत.
'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार
'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : राज्यातून मान्सून पूर्णपणे परतल्यानंतर आता हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. तापमान अचानक वाढ झाली आहे. अशातच शुक्रवारी मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये हंगामातील पहिली उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

‘यलो अलर्ट’ जारी

मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून तापमान वाढण्याची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येथे काही निवडक भागांत नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

कोकण-गोव्यात उष्ण, दमट हवामान

मान्सून निघून गेल्याने महाराष्ट्राच्या हवामानाचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. वाढलेले तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे दुपारच्या वेळी उकाड्याचा त्रास वाढला आहे. पुढील दोन दिवस कोकण आणि गोव्याच्या काही भागांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. या भागातील कमाल तापमान वाढले असून, काही ठिकाणी पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे.

ऑक्टोबरच्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, राज्यभर प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्ण माघार

मान्सूनच्या परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू झाला असून, आतापर्यंत देशाच्या निम्म्याहून अधिक भागातून मान्सून माघारी फिरला आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मान्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर गुरुवारी संपूर्ण राज्यातून मान्सून बाहेर पडला. सध्या उत्तर गोव्याचा काही भाग आणि उत्तर कर्नाटकापर्यंत मान्सूनची माघार झाली असून, पणजी, विजयपूर आणि बेळगाव अशी त्याची रेषा असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in