

मुंबई : भांडुप जलसंकुलातील उपकेंद्रात १ जून रोजी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होऊन जलउपसा यंत्रणा बंद पडले आहे. जल उपकेंद्राची दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून एक दोन दिवसांत काम पूर्ण होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे कुलाबा, फोर्ट, मलबार हिल, गिरगाव, भायखळा, दादर, प्रभादेवी, माहीम, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर आदी भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
मुंबईतील अनेक भागांत पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. शहर आणि पश्चिम उपनगरातील सुमारे १५ वॉर्डमध्ये गेल्या चार दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून नागरिकांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून माहिम टनेल, मालाड टनेल आणि मलबार हिल जलाशयामार्फत शहर व पश्चिम उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र उपकेंद्रातील बिघाडामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत अत्यल्प दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुलाबा, डोंगरी, मोहम्मद अली रोड, ग्रँट रोड, वाळकेश्वर, दादर, प्रभादेवी आणि माहीम परिसरातून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.