

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतून अवैधरीत्या जारी करण्यात आलेल्या हजारो जन्म व जात प्रमाणपत्रांच्या प्रकरणात महापौर रितू तावडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे मुंबईत अवैध घुसखोरी करणाऱ्यांवर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापौर रितू तावडे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी उघड केलेल्या या घोटाळ्याचे स्वरूप दिवसेंदिवस व्यापक होत असून, सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोमय्या हा मुद्दा सातत्याने मांडत आहेत. तपासादरम्यान पालिकेच्या २६ विभागांतून एकूण ८७,३४७ अवैध जन्म प्रमाणपत्रे जारी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेषतः ई-वॉर्ड, एल-वॉर्ड, भायखळा, गोवंडी आणि देवनार परिसरात मोठ्या प्रमाणावर अशी प्रमाणपत्रे दिल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत महापौरांनी आरोग्य विभागातील काही जुन्या अधिकाऱ्यांचे बदली करून नव्या नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहेत. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात आतापर्यंत ११९ जणांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित बनावट नावे पोर्टलवरून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“दोषी अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही,” असा इशारा महापौरांनी दिला.