मुंबई : बोगस पेंटिंग विकून बँकरला तब्बल 18 कोटींचा गंडा, मित्रांमुळे लक्षात आली फसवणूक; पोलीस तपास सुरू

५२ वर्षीय इन्व्हेस्टमेंट बँकरची दोन जणांनी १८ कोटी रुपयांच्या बनावट पेंटिंग्स विकून फसवणूक केली
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : ताडदेव येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय इन्व्हेस्टमेंट बँकरची दोन जणांनी १८ कोटी रुपयांच्या बनावट पेंटिंग्स विकून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सोमवारी पुनीत भाटिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. माहितीनुसार, ही घटना जानेवारी ते मे 2022 दरम्यान घडली. एका पार्टीत भाटिया यांची भेट देसाई आणि दिवाणजीमध्ये भागीदार असलेल्या विश्वंग देसाई नावाच्या व्यक्तीशी झाली आणि त्याच्यामार्फत त्यांची ओळख राजेश राजपाल नावाच्या एका व्यक्तीशी झाली. राजपाल चर्चगेट येथील आर्ट इंडिया इंटरनॅशनलमध्ये काम करतो आणि कफ परेड येथे त्याची आर्ट गॅलरी असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

भटिया यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, देसाई यांनी मनजीत बावा नावाच्या आर्टिस्टच्या 'कृष्णा विथ काऊज' नावाच्या पेंटिंगबद्दल सांगितले आणि या पेंटिंगची किंमत ६.७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले. भोपाळमध्ये राहणारे सुब्रत बॅनर्जी नावाचे निवृत्त आयएएस अधिकारी हे पेंटिंग विकतील, असे देसाई यांनी भाटिया यांना सांगितले. देसाई यांनी सादर केलेले दुसरे पेंटिंग आर्टिस्ट फ्रान्सिस न्यूटन सोझा यांचे होते, ज्याची किंमत १.७५ कोटी रुपये होती.

ही पेटिंग्स विकत घ्या, अन्यथा ती दुसऱ्या कुणाला विकली जातील, असे देसाई वारंवार सांगत होते, असा आरोप भाटिया यांनी केला. दोघांमध्ये सौदा झाला तेव्हा ६.७५ लाख रुपयांची रक्कम निश्चित झाली आणि भाटिया यांनी हा व्यवहार केला. या दोन्ही पेटिंग्स भाटिया यांच्या दिल्लीच्या पत्त्यावर पोहोचविण्यात आली.

त्यानंतर देसाई अशा आणखी पेटिंग्सबद्दल भाटिया यांच्याशी संपर्क साधत राहिला. भाटिया यांनी देसाईमार्फत राजपालकडून अशी ११ पेटिंग्स खरेदी केली आणि त्यासाठी एकूण १७ कोटी ९० लाख रुपये मोजले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आले-

मे महिन्यात भाटिया यांनी आपल्या पेटिंग्सचा संग्रह दाखविण्यासाठी काही मित्रांना दिल्लीच्या घरी बोलावले असता पेटिंग्स बोगस असल्याचे त्यांच्या एका मित्राच्या लक्षात आले. भाटिया यांनी बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधून मनजीत बावा यांच्या 'कृष्णा विथ काऊज' या पेंटिंगबद्दल विचारणा केली. तेव्हा हे पेंटिंग कधीही कोणाला विकले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर भाटिया यांनी देसाई आणि राजपाल यांच्याकडे विचारणा केली, पण त्यांनी दुर्लक्ष केले आणि नंतर पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यांनी तसे न केल्याने देसाई यांनी पोलिसांत धाव घेतली. देसाई आणि राजपाल यांनी दिलेल्या बिलाच्या प्रती, सत्यतेचे प्रमाणपत्र वगैरेही भाटिया यांनी पोलिसांना दिले.

आता, देसाई आणि राजपालविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२० (ब) , ३४ , ४०६ , ४२० , ४६७ , ४६८ , ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in