

मुंबई : अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चार मोठ्या खाद्यप्रतिष्ठानांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये कुलाबा येथील प्रसिद्ध 'कॅफे मोंडेगर' आणि कांदिवली पूर्व येथील 'महाराष्ट्र बिर्याणी सेंटर'चा समावेश आहे. अन्न सुरक्षा नियमावलीच्या 'शेड्युल ४' मधील निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
सण-उत्सवांच्या काळात विशेष मोहीम
गणेशोत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर एफडीएने बृहन्मुंबई क्षेत्रात ३८ खाद्यप्रतिष्ठानांची तपासणी केली असून दूध, खवा, तूप आणि मिठाईचे ४७ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या मोहिमेत २४८ किलो खाद्यपदार्थ (२२५ किलो खवा आणि २३ किलो बर्फी) जप्त करण्यात आले असून एका हॉटेलला २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
इतर तीन आस्थापनांवरही कुऱ्हाड
११ सप्टेंबरला केलेल्या तपासणीत शेड्युल्ड ४ चे उल्लंघन आढळल्याने एफडीएने खालील तीन ठिकाणांचे परवाने निलंबित केले. यात महाराष्ट्र बिर्याणी सेंटर (कांदिवली पूर्व), त्रिभुवन डेअरी फार्म (दुकान क्र. १ आणि ४, व्हीनस रीजन्सी सोसायटी, नवरोजी लेन, घाटकोपर पश्चिम) आणि महावीर कॅश्यू अँड फूड्स प्रा. लि. (भानुशाली नगर, टिळक रोड, घाटकोपर पूर्व) यांचा समावेश आहे.