

मुंबई : अन्न सुरक्षा आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईतील पाच प्रमुख अन्न व्यावसायिकांचे परवाने/नोंदणी निलंबित केली आहे. यामध्ये महालक्ष्मी रेसकोर्स येथील 'रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब'च्या आवारात चालणारे प्रसिद्ध 'गॅलॉप्स' रेस्टॉरंट आणि वांद्रे (पश्चिम) येथील 'ड्रिमर हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड'चा समावेश आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स येथील 'बीजेआरएस (गॅलॉप्स) रेस्टॉरंट'च्या पाहणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला. एफडीएच्या तपासणीदरम्यान फ्रीजमधील बर्फावर मांसाहारी पदार्थांचे रक्त आणि केचपचे डाग, फाटलेल्या पॅकिंगमध्ये साठवलेला कच्चा माल, स्वयंपाकघरात साचलेली तेलकट घाण, पडझड झालेल्या भिंती, अयोग्य ड्रेनेज व्यवस्था तसेच तेथे जिवंत झुरळे, मुंग्या, साचलेले पाणी आणि अन्न हाताळणाऱ्या कामगारांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणी व लसीकरणाच्या नोंदींचा अभाव दिसून आला.
वांद्रे येथील आस्थापनांवर कारवाई
वांद्रे (पश्चिम) येथील 'ड्रिमर हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये अन्न सुरक्षा नियमावलीच्या 'शेड्यूल ४' अंतर्गत आरोग्य आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या आस्थापनेचा परवाना निलंबित करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, वांद्रे (पश्चिम) येथील सेंट डोमिनिक रोडवर असलेल्या 'मिरारी' या आस्थापनामध्येही शेड्यूल ४ चे उल्लंघन आढळल्याने तिचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
'गुफरान सीख कॉर्नर'
वर्सोवा-यारी रोडवरील 'गुफरान सीख कॉर्नर' हे उपहारगृह वैध अन्न परवान्याशिवाय चालवले जात असल्याचे तपासात उघड झाले. येथे अन्नाची अयोग्य साठवणूक व वर्गीकरण, उपकरणांची व जागेची अस्वच्छता, कीटक नियंत्रणाचा अभाव, पिण्याच्या पाण्याची तपासणी न करणे आणि कामगारांच्या वैद्यकीय तपासणीच्या दाखल्यांचा अभाव अशा विविध त्रुटी आढळल्या. त्यामुळे २२ सप्टेंबर रोजी एफडीएने तातडीने आदेश जारी करून हे उपहारगृह बंद करण्याचे निर्देश दिले असून, वैध परवाना मिळेपर्यंत व सर्व त्रुटी दूर करेपर्यंत व्यवसाय सुरू करण्यास बंदी घातली आहे.
बनावट तूप व यंत्रसामग्री जप्त
सण-उत्सवांच्या काळात करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या कारवाईत, मालाड (पूर्व) येथील 'गुरुकृपा डेअरी प्रॉडक्ट्स' येथे दोन बॉयलर्समध्ये रिफाइंड सूर्यफूल तेल, वनस्पती आणि ब्रँडेड तूप एकत्र करून बनावट पांढरे व पिवळे तूप तयार केले जात असल्याचे उघड झाले. हे तूप 'पूजा तूप' या नावाने दिशाभूल करणाऱ्या लेबलसह विकले जात होते. या ठिकाणी उंदीर आणि झुरळांचा मोठा प्रादुर्भावही आढळून आला. एफडीएने १३.५५ लाख रुपये किमतीचे २४६४.०५ किलो भेसळयुक्त तूप व तेल तसेच सुमारे १.६० लाख रुपये किमतीचे दोन बॉयलर्स आणि खवा बनवण्याचे मशीन असा एकूण १५.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.