मुंबईतील ७ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; ५६४ लिटर दूध नष्ट

अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) लोअर परळ येथील 'मुंबई दरबार फॅमिली रेस्टॉरंट' आणि अंधेरी पश्चिम येथील 'ऑटोमन कॅफे' सह मुंबईतील ७खाद्य आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित केली आहे.
मुंबईतील ७ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; ५६४ लिटर दूध नष्ट
मुंबईतील ७ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; ५६४ लिटर दूध नष्ट
Published on: 

मुंबई : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) लोअर परळ येथील 'मुंबई दरबार फॅमिली रेस्टॉरंट' आणि अंधेरी पश्चिम येथील 'ऑटोमन कॅफे' सह मुंबईतील ७खाद्य आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित केली आहे. २३ आणि २४ ऑक्टोबरला राबवलेल्या वेगवेगळ्या धडक मोहिमांमध्ये विभागाने शहरातून ५६४ लिटर दूध नष्ट केले आणि ४.२२ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.

'अन्न सुरक्षा आणि मानके (परवाना आणि नोंदणी) नियम, २०११'च्या अनुसूची ४ चे उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर या उपाहारगृहांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये अस्वच्छ स्वयंपाकघरे (किचन) आणि ड्रेनेज प्रणाली, शाकाहारी आणि मांसाहारी अन्नाची अयोग्य साठवणूक, अनधिकृत खाद्य रंगांचा वापर आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे नसणे यांसारख्या गंभीर त्रुटी आढळल्या.

इतर आस्थापने

इतर आस्थापनांमध्ये जोगेश्वरी पश्चिम येथील 'चाचा ईगल कुल्फी फालुदा', अंधेरी पश्चिम येथील 'भारत कॅन्टीन', ओशिवरा येथील 'ग्रीन टर्टल हॅस्पिटॅलिटी', भायखळा येथील 'अतुल टिफिन' आणि शिवडी पश्चिम येथील 'पी. बी. एंटरप्रायजेस' यांचा समावेश आहे.

स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन

स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मानखुर्द येथील 'अगस्ती मिल्क एजन्सी 'विरुद्ध परवाना निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे, तर विनापरवाना व्यवसाय चालवल्याप्रकरणी गोवंडी पूर्व येथील 'यादव डेअरी'वर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. आंटॉप हिल येथील 'सागर मिल्क सेंटर'मध्ये साठवणूक आणि हाताळणीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ११,६२५ रुपये किमतीचे २५० लिटर दूध नष्ट करण्यात आले. तसेच धारावीतील 'शक्ती डेअरी' आणि माहिम पश्चिम येथील 'राहुल मिल्क सेंटर' येथे आणखी २२९ लिटर दूध नष्ट करण्यात आले.

खुले दूध जप्त

गोवंडी, मानखुर्द, अ‍ॅण्टॉप हिल, चेंबूर, धारावी आणि माहिममधील डेअऱ्या आणि दूध विक्री केंद्रांवर लक्ष्य केंद्रित करून राबवलेल्या स्वतंत्र मोहिमेत एफडीएने ५६४ लिटर दूध नष्ट केले. गोवंडी येथील 'साईनाथ डेअरी अँड फरसाण मार्ट' आणि मानखुर्द येथील 'महाराणा डेअरी 'मधून जप्त करण्यात आलेल्या ८५ लिटर संशयित खुल्या दुधाचा यामध्ये समावेश आहे. नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

नळबाजारातून गुटखा जप्त

एफडीएने नळबाजार परिसरात ४,२२,८८० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आणि तपासणीदरम्यान सात अनौपचारिक नमुने गोळा केले. गुन्ह्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in