Mumbai : कॅफे आयडियल, चेतनासह नऊ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित; FDA ची मोठी कारवाई

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी केलेल्या धडक तपासणी मोहिमेत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, दक्षिण मुंबईतील ९ नामवंत खाद्यसंस्थांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. यामध्ये कॅफे आयडियल, आयकॉनिक चेतना रेस्टॉरंट, बेराउट आणि नॅचरल आईस्क्रीम यांचा समावेश आहे.
Mumbai : कॅफे आयडियल, चेतनासह नऊ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित; FDA ची मोठी कारवाई
Mumbai : कॅफे आयडियल, चेतनासह नऊ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित; FDA ची मोठी कारवाई
Published on: 

मुंबई : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी केलेल्या धडक तपासणी मोहिमेत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, दक्षिण मुंबईतील ९ नामवंत खाद्यसंस्थांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. यामध्ये कॅफे आयडियल, आयकॉनिक चेतना रेस्टॉरंट, बेराउट आणि नॅचरल आईस्क्रीम यांचा समावेश आहे. मियाँ कबाब्स, श्रीयोग रेस्टॉरंट, गुप्ता फ्रूट ज्युस सेंटर, प्रकाश डोसा आणि सौरभ हॉटेल्स या इतर आस्थापनांवरही ही कारवाई करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ३२(३) आणि अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसाय परवाने आणि नोंदणी) नियमने, २०११ च्या नियम २.१.८(४) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान अन्न तयार करण्याच्या जागांवर अस्वच्छता, चुकीच्या पद्धतीने अन्न साठवणूक, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अन्नसुरक्षेची कागदपत्रे नसणे यांसारख्या त्रुटी आढळल्या.

कच्चे, शिजवलेले मांसाहारी अन्न आवरणाशिवाय एकत्र

कुलाबा येथील 'कॅफे आयडियल'मध्ये अन्न तयार करण्याच्या काऊंटर्सजवळ साचलेला ओला कचरा, उघडे कापलेले कांदे, उघड्या विद्युत तारा आणि स्वयंपाकघराच्या छतावरील प्लास्टर झडल्याचे आढळले तसेच कच्चे आणि शिजवलेले मांसाहारी अन्न कोणत्याही आवरणाशिवाय एकत्र ठेवण्यात आले होते आणि कामगारांकडे योग्य संरक्षणात्मक कपडे नव्हते.

मेनू कार्डवर जिवंत झुरळ, माशांचा वावर

काला घोडा येथील 'चेतना रेस्टॉरंट'मध्ये गंजलेले रॅक्स, खराब झालेले रेफ्रिजरेटर गॅस्केट्स, बुरशीची वाढ, गळणारे छत आणि स्वयंपाकघराच्या जमिनीवर सांडपाणी वाहत असल्याचे एफडीएने नोंदवले. फोर्ट येथील 'मियाँ कबाब्स'मध्ये ग्राहकाच्या टेबलवर ठेवलेल्या मेनू कार्डवर जिवंत झुरळ आढळले, तर परिसरात माशांचा वावर होता तसेच कच्चे चिकन ४ अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी तापमानाऐवजी १३ अंश सेल्सिअसवर उघड्यावर ठेवण्यात आले होते.

अन्नपदार्थांसोबत मोबाईल चार्जर

कफ परेड येथील 'बेराऊट'मध्ये उंदरांचा वावर, जाळी नसलेल्या उघड्या वाटेतून आत येणाऱ्या माशा, गंजलेली रेफ्रिजरेटर उपकरणे आणि युटेन्सिल रॅकखाली उघडी गटार लाइन आढळली. 'नॅचरल आईस्क्रीम'च्या चर्चगेट शाखेत अस्वच्छ फ्रिझरमध्ये उघडे आईस्क्रीम, उत्पादन आणि एक्सपायरी डेट नसलेली उत्पादने आणि परिसरात माशा व धूळ आढळली. अन्नपदार्थांसोबत मोबाईल चार्जरसारख्या बिगर-अन्न वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या.

साठवणुकीचे नियम मोडले

श्रीयोग रेस्टॉरंट, गुप्ता फ्रूट ज्युस सेंटर, प्रकाश डोसा आणि सौरभ हॉटेल्समध्येही स्वच्छता आणि अन्न साठवणुकीचे नियम मोडल्याचे आढळले. कोकण विभागात केलेल्या वेगळ्या कारवाईत ठाण्यातील 'ब्लिंक कॉमर्स', 'ब्रोडयामा फूड्स' आणि 'सागर स्वीट अँड बेकरी' या तीन आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. या निलंबनाच्या कालावधीत सर्व १२ आस्थापनांना अन्नपदार्थ खरेदी, विक्री किंवा वाटप करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)