Mumbai : सत्कार केटरर्ससह ८ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उल्लंघनेनंतर FDA ची कारवाई

अन्न सुरक्षेचे निकष पायदळी तुडवत, अस्वच्छता आणि गंभीर नियमभंगाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई विभागातील प्रसिद्ध ‘रोशन बेकरी’ (माझगाव) आणि ‘आर. एन. कूपर रुग्णालया’ची कर्मचारी कॅन्टीन चालवणारी ‘सत्कार केटरर्स’सह एकूण ८ उपाहारगृहांचे परवाने निलंबित केले आहेत.
Mumbai : सत्कार केटरर्ससह ८ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उल्लंघनेनंतर FDA ची कारवाई
Published on: 

मुंबई : अन्न सुरक्षेचे निकष पायदळी तुडवत, अस्वच्छता आणि गंभीर नियमभंगाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई विभागातील प्रसिद्ध ‘रोशन बेकरी’ (माझगाव) आणि ‘आर. एन. कूपर रुग्णालया’ची कर्मचारी कॅन्टीन चालवणारी ‘सत्कार केटरर्स’सह एकूण ८ उपाहारगृहांचे परवाने निलंबित केले आहेत. याशिवाय इतर ३ आस्थापनांचे नोंदणी प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले आहे.

एफडीएच्या तपासणीदरम्यान या ११ आस्थापनांमध्ये अन्नाची अयोग्य साठवणूक, कीटकांचा प्रादुर्भाव (कीटक संसर्ग), खाद्येतर दर्जाच्या साहित्याचा वापर, काळे पडलेले किंवा पुनर्रूपित (पुन्हा वापरलेले) तेल, निकृष्ट स्वच्छता आणि अपुरी कागदपत्रे आढळली.

नियमभंग

रोशन बेकरी (माझगाव) येथे बेकिंग ट्रे आणि अल्युमिनियमचे साचे गंजलेले व डागाळलेले आढळले. झाकण नसलेले तयार अन्न, अन्न-पदार्थांसाठी अयोग्य पॅकेजिंग साहित्य आणि जुने, काळे पडलेले तेल पुन्हा वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले तसेच तुटलेली व मळकी फरशी, निकृष्ट ड्रेनेज आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव आढळून आला.

विलेपार्ले येथील सत्कार केटरर्सकडून कूपर रुग्णालयाची कर्मचारी कॅन्टीन चालवणाऱ्या या आस्थापनामध्ये अन्न निरीक्षकांना माशा आणि झुरळे आढळली. कीटक नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी नाही तसेच कच्चे-शिजलेले आणि शाकाहारी-मांसाहारी अन्न वेगळे ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. स्वच्छता वेळापत्रक, कचरा विल्हेवाट आणि कामगारांची स्वच्छता निकोप नसल्याचे समोर आले.

या आस्थापनांवरही कारवाई

कारवाईचा सामना करणाऱ्या इतर आस्थापनांमध्ये बोरिवली येथील ‘नॉम नॉम रेस्टॉरंट्स’, ‘मम्माज किचन’ आणि ‘छोटूस किचन’; अंधेरीतील ‘सूरज लामा मोमोज’; ‘ताडदेव लंच होम’; मुंबई सेंट्रलचे ‘शगुनस व्हेज रेस्टॉरंट’; बायखलाचे ‘जोहर-ए-इस्लाम हॉटेल’; मागावचे ‘मिस्टर मोमो किंग’ आणि गिरगावचे ‘भारत कॉफी हाऊस’ यांचा समावेश आहे.

काय होत्या त्रुटी

अयोग्य स्थिती, सुरक्षा रेकॉर्डचा अभाव, माशा, जास्त गोठवलेले अन्न, अस्वच्छता अशा अनेक त्रुटी आढळल्या.

ठाणे, रायगडमध्येही कारवाई

१ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ठाणे आणि रायगडमध्ये एफडीएने पाच दिवसांच्या मोहिमेत २.१७ कोटी रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला असून, १४ जणांना अटक करून ६ एफआयआर नोंदवले. याशिवाय, चिकन, सॉस, मैदा, तिखट, मटार आणि फराळ यांसारखा ७.८८ लाख किमतीचा ११,४८७ किलो साठा जप्त केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in