अग्निसुरक्षेसाठी अग्निशमन दल सज्ज; भायखळा येथील मुख्यालयात वार्षिक अग्नी कवायत स्पर्धा

मुंबई अग्निशमन दलाचे जवान अग्निसुरक्षेसाठी सतत प्रयत्नशील असतात. हे जवान प्रशिक्षण घेऊन अधिक सक्षम होत आहेत.
अग्निसुरक्षेसाठी अग्निशमन दल सज्ज; भायखळा येथील मुख्यालयात वार्षिक अग्नी कवायत स्पर्धा
Published on

मुंबई : मुंबई अग्निशमन दलाचे जवान अग्निसुरक्षेसाठी सतत प्रयत्नशील असतात. हे जवान प्रशिक्षण घेऊन अधिक सक्षम होत आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन मुंबईचे नाव उज्ज्वल करण्याची क्षमतादेखील मुंबई अग्निशमन दलामध्ये आहे. अग्निशमन कवायती पाहिल्यानंतर मुंबईच्या अग्निसुरक्षेसाठी अग्निशमन दल सुसज्ज आहे, याची खात्री पटली, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दल अंतर्गत वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२५ ची अंतिम फेरी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात शुक्रवारी पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद, प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सैनी म्हणाले की, यंदाचे वर्ष हे प्रशिक्षण वर्ष म्हणून घोषित केले आहे. कांदिवली येथे सुरू होणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात अग्निकवायती होतील. नागरिकांचे प्राण वाचवत असताना स्वत:ची देखील तेवढीच काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी जवानांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येईल.

अभिनेता सोनू सूद यांनी देखील मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले. लाखो लोकांचे प्राण वाचवणारे मुंबई अग्निशमन दलाचे जवान हेच खरे नायक (हिरो) आहेत. अग्निशमन दलाच्या अग्नी कवायती या प्रोत्साहित करणाऱ्या आहेत. या दलाची सज्जता कौतुकास्पद आहे. नोकरी करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत. परंतु, अग्निशमन दलासारख्या क्षेत्रात लोकांचे प्राण वाचविण्याची संधी मिळते. हेच कार्य मुंबई अग्निशमन दलाचे जवान समर्पित भावनेने करत आहेत.

प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी प्रास्ताविक केले. अग्निशमन सप्ताहनिमित्ताने दिनांक १४ एप्रिल ते दिनांक २० एप्रिल

२०२५ या कालावधीत अग्निसुरक्षा जनजागृतीसाठी मुंबई अग्निशमन दलाकडून मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली.

स्पर्धेतील विजेते

फायर पंप ड्रिल स्पर्धा

प्रथम क्रमांक - गोवालिया टँक अग्निशमन केंद्र

द्वितीय क्रमांक - मुलुंड अग्निशमन केंद्र

तृतीय क्रमांक - नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्र

ट्रिपल एक्सटेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल स्पर्धा

प्रथम क्रमांक - फोर्ट अग्निशमन केंद्र

द्वितीय क्रमांक - भायखळा अग्निशमन केंद्र

तृतीय क्रमांक - मरोळ अग्निशमन केंद्र

फायर पंप ड्रिल स्पर्धा (महिला)

प्रथम क्रमांक - विक्रोळी अग्निशमन केंद्र

ट्रिपल एक्स्टेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल स्पर्धा (महिला)

प्रथम क्रमांक – नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्र

द्वितीय क्रमांक - विक्रोळी अग्निशमन केंद्र

सर्वोत्कृष्ट संघ - फोर्ट अग्निशमन केंद्र

सर्वोत्कृष्ट अग्निशमन केंद्र अधिकारी - अमोल मुळीक

logo
marathi.freepressjournal.in