जोगेश्वरी पश्चिम भागामध्ये असलेल्या फर्निचर कंपाउंडमध्ये आज भयंकर आग लागली. सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या परिसरात बहुतांश दुकाने ही फर्निचरची असून काचेची दुकाने आणि गोदामीही आहेत. या आगीच्या विळख्यात शेकडो दुकाने आली असल्याची माहिती देण्यात येत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या ८ ते १० गाड्या घडनास्थळी दाखल झाल्या. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११च्या सुमारास ही आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात मोठा गोंधळ झाला. या ठिकाणी असणारे दुकानदार आपले दुकानातील उरलेसुरले सामान बाहेर काढण्यासाठी धडपड करताना दिसले. मुख्य रस्त्यावरच ही आगीची घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, आग विझवण्याच्या गाड्या तात्काळ न आल्यामुळे बऱ्याच दुकानांचे नुकसान झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. अद्याप, ही आग नेमकी कशामुळे लागली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.