Mumbai : कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाच्या पहिल्या तुळईचे काम पूर्ण; दुसरी तुळई बसविण्‍याच्‍या प्रक्रियेला वेग

मशीद बंदर रेल्वे स्थानक व पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेली पहिली तुळई (गर्डर) नियोजित स्‍थळी स्थापित करण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
Mumbai : कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाच्या पहिल्या तुळईचे काम पूर्ण; दुसरी तुळई बसविण्‍याच्‍या प्रक्रियेला वेग
Published on

मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानक व पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेली पहिली तुळई (गर्डर) नियोजित स्‍थळी स्थापित करण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

रविवारी मध्‍यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० या तीन तासांच्‍या विशेष वाहतूक व वीजपुरवठा खंड (ब्‍लॉक) दरम्‍यान लोखंडी तुळई स्‍थापित करण्‍यात आली. तुळई स्थानांतराची (साइड शिफ्टिंग) प्रक्रिया पूर्ण झाल्‍याने आता दुसरी तुळई बसविण्‍याच्‍या प्रक्रियेला वेग मिळणार आहे.

या कामानंतर आता दुसरी तुळई बसविण्‍याच्‍या प्रक्रियेला वेग मिळणार असून डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत पुलाची दुसरी तुळई बसविण्‍याचे आणि उर्वरित कामे पूर्णत्वास नेण्याचे नियोजित आहे.

दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर ७० मीटरपर्यंत सरकविण्याचे काम गेल्या सोमवारी (१४ ऑक्‍टोबर) पूर्ण झाले. मध्य रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व रेल्वे ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्‍यात आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व मध्य रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राइट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षण अंतर्गत हे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाबरोबर योग्य समन्वय साधून हे काम पूर्ण केले आहे. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) शहर  राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी योग्य नियोजन करून तुळई स्‍थापित केली आहे.

कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने सलग दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेतले होते. या ब्लाॅकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकल सेवा खंडित करण्यात आल्या होत्या. कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे अनेक वर्षांपासून सुरू आहे. तसेच मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल कमी संख्येने चालविण्यात आल्या होत्या. यावेळी काही लोकल फेऱ्या कमी करण्यात आल्या.

जोखीम व तांत्रिक बाबींची तपासणी

७० मीटर लांब आणि ९.५० मीटर रुंद आकाराच्या या तुळईचे वजन ५५० मेट्रिक टन आहे. तुळई बसवण्यासाठी रेल्वे रुळालगत तुळई पूर्णतः अधांतरी (कॅण्‍टीलिवर) होती. त्यानुसार गेल्या सोमवारी (१४ ऑक्‍टोबर) तुळई पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकवण्यात आली, तर शनिवार (१९ ऑक्‍टोबर) आणि रविवार (२० ऑक्‍टोबर) रोजी रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासून, त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक व वीज पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये खंड (ब्लॉक) मिळाल्यानंतर तुळई स्थापनेचे काम पूर्ण करण्यात आले. त्‍यानंतर तुळईवर लोखंडी सळई अंथरून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या दरम्यानच पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे काम हाती घेतले जाणार आहे. 

logo
marathi.freepressjournal.in