

मुंबई : आम्हाला बसमध्ये चढू न दिल्यास किंवा बस थांबवली नाही तर आम्ही हातात कोयता घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा मच्छिमार महिलांनी दिला आहे. आम्हाला क्रॉफर्ड मार्केटला मासे आणायला दररोज जावे लागते. खारदांड्याहून तिथे जाण्यासाठी एकच बस आहे. तीही वेळेवर येत नाही. मालाडहून मासळी घेऊन आलो की रिक्षामध्येही घेत नाहीत. मालाडमधून मासळी आणताना त्यात बर्फ घालत नाही. मच्छी का बास आता है... असे बोलून आमच्यासाठी नाकं मुरडली जात आहेत. बेस्टचे ड्रायव्हरसुद्धा बास्केट बघितली की बस थांबवत नाहीत. मच्छी घेऊन ट्रेनमध्येही आम्हाला चढू दिलं जात नाही. माल डबा रेल्वेचा आहे, त्यातही परप्रांतीय लोक आहेत. आमच्या म्हाताऱ्या कोळिणी आहेत. त्या धावत्या बसमध्ये कशा चढणार? असा सवाल कोळी महिलांनी उपस्थित केला.
कुलाब्याहून वांद्रे येथे टॅक्सीला ८०० रुपये लागतात. बसचे तिकीट ३०-३५ रुपये आहे. त्यात १५ रुपये मालाचे घेतात. हे अवघे ५० रुपयांत होते. पण बस थांबवली नाही की ६०० रुपये द्यावे लागतात. एकच बस आहे. बेस्टच्या कंडक्टर, आम्हाला त्यामुळे, ड्रायव्हरने यापुढे आम्हाला बसमध्ये चढू दिले नाही किंवा बस थांबवली नाही तर आम्ही रस्त्यावर उभे राहणार आहोत. आम्ही सगळ्या कोळी बायका कोयता हातात घेऊ आणि बघतो मग कशी बस नाही थांबवत, अशा शब्दात कोळी महिलांनी बेस्टविरोधात संताप व्यक्त केला आहे.
बेस्टवर मोर्चा काढण्याचा इशारा
दरम्यान, उबाठाचे नगरसेवक चिंतामणी निवाटे म्हणाले की, आमच्या महिला सकाळी ४ वाजता धक्क्यावर जातात. माल घेतल्यावर त्यांना मार्केटमध्ये जायला त्रास होतो. बसची संख्या कमी आहे. बेस्टने भूमिका न बदलल्यास माझ्या कोळी महिलांना घेऊन बेस्टवर मोर्चा काढण्यात येईल.