
मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच फ्लॅटची विक्री दोन वेगवेगळ्या खरेदीदारांना केल्याचा आरोपावरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन प्रसिद्ध बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनिल कोठारी आणि राजेंद्र कोठारी असे या बिल्डरांचे नाव असून ते आर. ए. असोसिएट्स या कंपनीचे भागीदार आहेत. या दोघांविरुद्ध ६.०८ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, ७१ वर्षांचे पवनकुमार आर्य, हे त्यांची पत्नी, मुलगा व सून यांच्याबरोबर आर्य शिप इंडस्ट्रीज प्रा. लि. नावाच्या कंपनीद्वारे व्यवसाय चालवतात. ते नेपन्सी रोडजवळील ऑर्बिट आर्य इमारतीत वास्तव्यास असून त्यांच्या कंपनीचे कार्यालय मित्तल कोर्ट, नरिमन पॉईंट येथे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०१४ रोजी, आर्य यांनी आर.ए. असोसिएट्ससोबत दादर (पूर्व) येथील आर.ए. रेसिडेन्सीच्या बी-विंगमधील ३१व्या मजल्यावरचा फ्लॅट क्रमांक ३१०१, चार पार्किंग स्लॉटसह खरेदी करण्याचा करार केला होता. व्यवहाराची एकूण रक्कम ६.०८ कोटी इतकी होती. याच दिवशी आर्य यांनी ५.४७ कोटींचा चेक दिला होता.
आर्य यांना ३० जून २०१८ पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ताबा दिला गेला नाही. जेव्हा आर्य यांनी तातडीने ताबा मागितला, तेव्हा कोठारी यांनी ६७.८० लाखांची शिल्लक रक्कम मागितली. आर्य यांनी ४ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान आरटीजीएस द्वारा ही रक्कम भरली. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी, आर्य यांना फ्लॅटचा ताबा व विकासकांकडून पुष्टीपत्र मिळाले. मात्र, जून २०२३ मध्ये, जेव्हा आर्य यांनी ऑनलाइन प्रॉपर्टी रेकॉर्ड तपासले, तेव्हा त्यांना आढळले की सदरचा फ्लॅट नविनचंद्र देवराज देधिया, फोरम राजीव देधिया आणि राजीव नविनचंद्र देधिया यांच्या नावावर नोंदणीकृत झाला आहे.
आर्य यांनी आधीच मालकी मिळवलेला फ्लॅट कोठारी बंधूंनी पुन्हा दुसऱ्याला विकला आहे, हे लक्षात येताच त्यांनी १० ऑक्टोबर २०२४ रोजी कोठारीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत प्राथमिक तपासाअंती, आर्थिक गुन्हे शाखेने माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
...आणि फसवणूक उघडकीस आली
आर्य यांनी मिळवलेल्या कागदपत्रांतून समजले की, राजेंद्र कोठारी यांच्यामार्फत देधिया कुटुंबाला फ्लॅट विकण्यात आला. हे फ्लॅट आर्य यांना आधीच विकलेले असतानाही बिल्डर कंपनीने देधिया कुटुंबाकडून २.७५ कोटी स्वीकारले. २०१४ चा आर्य यांच्यासोबतचा करार रद्द केला आहे, असे कोठारी यांनी खोटे सांगितले. मूळ करार रद्दीकरण कागदपत्रावर व्हाइटनर वापरून फेरफार करण्यात आलेला आढळला.