Mumbai : मध्य वैतरणा धरणावर 'फ्लोटिंग सोलार'; BMC ची वार्षिक ९ कोटी रूपयांची बचत होणार, वीजनिर्मिती किती?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण या ठिकाणी तरंगता सौरऊर्जा आणि जलविद्युत निर्मिती असलेला संकरित ऊर्जा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. एकूण ८.५ हेक्टर क्षेत्रफळाच्या पाण्यावर हा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प व्यापलेला असेल.
Mumbai : मध्य वैतरणा धरणावर 'फ्लोटिंग सोलार'; BMC ची वार्षिक ९ कोटी रूपयांची बचत होणार, वीजनिर्मिती किती?
Published on

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण या ठिकाणी तरंगता सौरऊर्जा आणि जलविद्युत निर्मिती असलेला संकरित ऊर्जा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यातून एकूण २६.५ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

आगामी अडीच वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होणे अपेक्षित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या संकरित (हायब्रीड) वीजनिर्मिती प्रकल्पामुळे जवळपास ९ कोटी रूपये इतकी वार्षिक बचत करणे शक्य होईल.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणाच्या जलाशयातून मुंबईला दैनंदिन ४५५ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईच्या पाणीपुरवठा यंत्रणेत या धरणाचा ११ टक्के इतका वाटा आहे. या तलावाची एकूण साठवण क्षमता ही १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर इतकी आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी सौरऊर्जा आणि जलविद्युत निर्मितीसाठी वैतरणा सोलार हायड्रो पॉवर जेनको कंपनीसोबत ऊर्जा खरेदी करार करण्यात आला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज प्रति युनिट ४.७५ रूपये या समतुल्य दराने खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमार्फत ही वीज राज्याच्या ग्रीडला जोडून वाहून नेण्यात येईल. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी (महावितरण) सोबत करार करण्यात येईल. वीज खरेदीसाठीचा महावितरणसोबतचा करार आगामी काळात करण्यात येईल. या वीजखरेदी करारामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात लागणारी वीजवापराच्या मोबदल्यात जवळपास ९ कोटी रूपयांची बचत होणे अपेक्षित आहे. जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी १० मेगावॅटचे दोन जनरेटरच्या माध्यमातून २० मेगावॅट इतकी वीज निर्मिती करणे शक्य होणार आहे.

फ्लोटिंग सोलर तंत्रज्ञान

सौरविद्युत निर्मितीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी एकूण ६.५ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे. फ़्लोटिंग सोलर या तंत्रज्ञानावर आधारित वीजनिर्मिती या प्रकल्पाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. एकूण ८.५ हेक्टर क्षेत्रफळाच्या पाण्यावर हा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प व्यापलेला असेल. बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर प्रकल्प आधारित आहे. प्रकल्पाचे संचलन सुरू झाल्यापासून पुढील २५ वर्षांची देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी ही सेवा पुरवठादार कंपनीची असेल.

logo
marathi.freepressjournal.in