मुंबईतील फ्लायओव्हर खड्डेमुक्त करा; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

मुंबईतील फ्लायओव्हर खड्डेमुक्त करण्यासाठी पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ सुरू करावे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देशित केले. त्यांनी विकासकामांचा दर्जा आणि गुणवत्ता राखत ठरलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचेही सांगितले.
मुंबईतील फ्लायओव्हर खड्डेमुक्त करा; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
Published on

मुंबई : मुंबईतील फ्लाय ओव्हर खड्डेमुक्त करा. यासाठी पावसाळा संपताच खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणाऱ्या सर्व विकासकामांचा दर्जा, गुणवत्ता राखत ही कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्याच्या सर्व शाश्वत विकासाचे उद्दीष्ट अग्रेसर ठेवण्यासाठी सन २०२८ पर्यंत जिल्ह्याचे सामाजिक व आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करून रोजगार वाढविण्याचे ध्येय आहे. मत्स्यव्यवसाय, रत्न आणि दागिने, लेदर, पर्यटन, आरोग्य, वाहतूक, रिअल इस्टेट ही क्षेत्रे निवडली आहेत. निवडलेल्या उपक्षेत्रांचा सन २०२८ पर्यंत जिल्ह्याचा जीडीपी रुपये १,५२,७५३ कोटींवरून रुपये ३,५१,३६१ कोटींवर येण्याचे प्रस्तावित असल्याचे ते म्हणाले.

निवडलेल्या उपक्षेत्रांचा सन २०२४-२०२५ साठी जिल्हा कृती आराखडा व सन २०२८ पर्यंतचा पाचव्या वर्षीय जिल्हा कृती आराखडा शासनाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आला आहे. नियोजन विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०२४-२०२५ पासून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील नियतव्यापैकी ३३ टक्के जिल्हा विकास आराखडा अंतर्गत वार्षिक कृती आराखड्यासाठी निश्चित केला असल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.

५५३ कोटींचा निधी मुदतीत खर्च करणे क्रमप्राप्त

जिल्हा वार्षिक योजना २०२५-२०२६ मध्ये सर्वसाधारण योजनेंतर्गत ५२८ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना २२ कोटी, असा ५५३ कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी मंजूर योजना व कामांवर विहित मुदतीत खर्च झाला पाहिजे, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिले.

logo
marathi.freepressjournal.in