धैर्य गजरा/मुंबई
झटपट पदार्थ आणून देणारी अॅप घरोघरी लोकप्रिय झाली आहेत. अॅपवरून ऑर्डर दिल्यानंतर काही मिनीटात डिलीव्हरी बॉय गरमागरम जेवण घरपोच आणून देतो. पण, जेवणाच्या मूळ किंमतीवर २५ ते ४० टक्के अतिरिक्त शुल्क या अॅपवरून आकारले जाते. त्यामुळे ग्राहक व रेस्टॉरंट व्यावसायिक त्रासले गेले आहेत.
देशाच्या विविध भागात 'फूड डिलिव्हरी' बाजारपेठ विस्तारली आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या डोरा डिसोझा यांनी सांगितले की, त्यांनी एका डिलिव्हरी अॅपवरून ३०० रुपयांची चिकन फ्राईड राईस मागवली होती, मात्र त्यांना ४२० रुपये मोजावे लागले. विशेष म्हणजे, संबंधित रेस्टॉरंट त्यांच्या घरापासून अवघ्या १.५ किलोमीटर अंतरावर आहे.
सध्याच्या बाजारपेठेत 'स्विगी' आणि 'झोमॅटो' कंपन्यांचे वर्चस्व आहे. मात्र, या प्लॅटफॉर्म्सवर आकारले जाणारे उच्च कमिशन आणि जाहिरात शुल्कामुळे रेस्टॉरंट चालकांचा नफा धोक्यात आला आहे.
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रणव रुंगटा यांनी सांगितले की, कमिशन आणि जाहिरातींसारख्या खर्चातच सुमारे ६० टक्के रक्कम खर्च होते. यामुळे क्लाऊड किचनचा टिकाव लागणे कठीण होत असून, जरी त्यांचा नफा सकारात्मक असला तरी व्यवसायाचा खर्च खूप जास्त आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले की, दोन्ही प्लॅटफॉर्म्सचे कमिशन आणि जाहिरात शुल्क खूप जास्त आहे. रेस्टॉरंट्स या अॅप्समुळे त्रस्त झाली असून, आता हा भार वाटू लागला आहे. अतिरिक्त शुल्कामुळे विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांसारखे ग्राहक या सुविधांपासून दूर जात आहेत.
साकीनाका येथील मीत भानुशाली (२०) या विद्यार्थ्याने सांगितले की, अॅप्सवरील जेवणाच्या किमती रेस्टॉरंटच्या मेनूच्या तुलनेत आधीच जास्त असतात आणि त्यात अतिरिक्त शुल्क आकारले जाते, जे किमान खर्चात राहतात त्या विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बाब आहे.
या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर 'रॅपिडो'चे 'ओनली' आणि 'स्विगी'चे 'टॉइंग' आदी नवीन पर्याय बाजारात आले आहेत. हे अॅप पॅकेजिंग आणि प्लॅटफॉर्म शुल्क काढून टाकून मूळ रेस्टॉरंटच्या दरातच जेवण देण्याचा दावा करतात.
रॅपिडोचे संस्थापक अरविंद संका यांनी त्यांचे 'अॅप' पारदर्शक आणि मूल्य-आधारित असल्याचे म्हटले आहे. टॉइंगचे मुख्य व्यावसायिक अधिकारी सिद्धार्थ भाकू यांनी सांगितले की, हे अॅप किंमतीबाबत संवेदनशील ग्राहकांसाठी डिझाइन केले आहे. यात लहान डिलिव्हरी, कमी मेन्यू आणि ऑर्डर्सचे एकत्रित वितरण करून खर्च कमी केला जातो.
शेट्टी म्हणाले की, त्यांना या मॉडेलची माहिती नाही, परंतु ते या संकल्पनेचे स्वागत करतात. रुंगटा यांनी नमूद केले की, सध्याचे मॉडेल चांगले नाही आणि ग्राहकांचा कल 'टॉइंग' कडे अधिक आहे. या अॅपचे गेल्या सात वर्षांत ५० लाखाहून अधिक डाऊनलोड्स झाले आहेत.
रेस्टॉरंटमधून पार्सल सोयीचे
चेंबूर येथे राहणाऱ्या भक्ती चंदानी (२७) यांनी सांगितले की, अतिरिक्त शुल्कामुळे अॅपवरून मागवण्यापेक्षा स्वतः रेस्टॉरंटमधून जाऊन पार्सल आणणे अधिक सोयीचे वाटते. 'कॅश ऑन डिलिव्हरी' ऑर्डर्सही महाग पडतात.