मुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील गळती थांबण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती दिली असून आता ठाकरे गटाचे मागाठाणे विधानसभा मतदारसंघामधील प्रभाग क्रमांक-३ चे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.
बाळकृष्ण ब्रीद यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षभरात मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी एक एक करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आतापर्यंत ३० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. यावेळी शिवसेनेचे सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, माजी नगरसेवक राम रेपाळे, गोरेगाव विभागाचे विभागप्रमुख स्वप्नील टेम्बवलकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ब्रीद यांच्यासह त्यांचा मुलगा हृषीकेश ब्रीद, विधानसभा समन्वयक दत्ताराम काडगे, ग्राहक कक्ष वॉर्ड संघटक दत्ताराम चिंदरकर, उपशाखाप्रमुख संतोष यादव, सचिन येडेकर, अनिल बनकर यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला.