मुंबई : पर्यटनाच्या उद्देशाने दक्षिण मुंबईत इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या चालवण्यास अटी-शर्तींनुसार परवानगी देण्यात आली आहे. मात्र या गाड्या विनापरवाना धावत असून यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरी राज्य सरकारच्या अटी-शर्तींनुसार परवानगी घेत या गाड्या धावत आहेत की नाही, याची तपासणी करून विनापरवाना गाड्या जप्त करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी परिवहन आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.
महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये दक्षिण मुंबईत इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या चालवण्यास काही अटी-शर्तींसह मान्यता दिली आहे. तरी विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या ठराविक मार्गांवर धावताना येथील रहिवाशांना दिसल्या आहेत. २० ऑगस्ट २०१९ मध्ये जारी केलेल्या महाराष्ट्र सरकारच्या जीआरनुसार, कंपनी किंवा व्यक्तीकडे प्रस्तावित इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या या केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ च्या नियम १२६ नुसार एआरएआय (ऑटो रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) सारख्या केंद्र सरकारच्या एजन्सीने मंजूर/पास केलेली असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा मुद्दा पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित असल्याने, संबंधित कंपनीने/व्यक्तीने वर नमूद केलेल्या जीआर अटींचे पालन केले आहे की, नाही याची पडताळणी करण्यासाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाला त्वरित निर्देश द्यावेत. तसेच जीआर नुसार गाड्या धावत नसतील तर तत्काळ वाहन जप्त करण्यासह उचित कारवाई करावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली.
मार्ग, वेळा निश्चित कराव्यात
महाराष्ट्र सरकारच्या जीआरनुसार, इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या केवळ पर्यटनाच्या उद्देशाने चालतील आणि वाहतूक पोलिसांनी मार्ग आणि त्यांच्या वेळा सुनिश्चित केलेल्या पाहिजेत. शासनाने अशा इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या चालवण्यासाठी मार्ग आणि वेळ निश्चित करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर सोपवली आहे. तरी वाहतूक पोलीस दक्षिण मुंबईत चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनिवार्य मान्यता व पालनाकडे दुर्लक्ष का करतात? वाहतूक पोलिसांनी याची खात्री करणे आवश्यक आहे. नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे नार्वेकर म्हणाले.