

मुंबई : दाऊदी बोहरा समाजाच्या वारसा हक्काबाबत २०२४ मध्ये दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालानंतर, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल आणि त्यांच्या कुटुंबाला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी २४ एप्रिल २०२४ रोजी दिलेल्या निकालात सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांची दाऊदी बोहरा समाजाचे ५३ वे धर्मगुरू (दाई अल-मुतलक) म्हणून नियुक्ती कायदेशीर ठरवली होती. त्यांनी या संदर्भातील जुना वाद फेटाळून लावला होता.
तेव्हापासून गेल्या १० महिन्यांपासून न्यायमूर्ती पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांना पत्राद्वारे धमकावले जात आहे. ५ जून २०२५ रोजी लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या न्यायमूर्तींच्या मुलीला पुन्हा एक धमकीचे पत्र मिळाले. न्यायमूर्तींनी एका युट्यूब व्हिडिओद्वारे जाहीर माफी मागावी आणि हा निकाल 'दबावाखाली' दिला असल्याचे कबूल करावे अशी त्यांना धमकी देणाऱ्यांची मागणी आहे.
वकिलांचा निषेध
मुंबई बार असोसिएशनने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करणे ही लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवरील हल्ला असल्याचे सांगत, असोसिएशनने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती पटेल हे २५ एप्रिल २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. हा वादग्रस्त खटला आता उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे.